सिनियर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत नाशिकला हरवले
नाशिक : नववी सिनियर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत हिंगोली संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले. नाशिक येथील सय्यद पिंपरी क्रीडा संकुल येथे टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या स्पर्धेत हिंगोलीने प्रथम, नाशिक मनपाने द्वितीय, तर रत्नागिरीने तृतीय क्रमांक पटकावला. विजयी संघांचे त्यांच्या जिल्ह्यांतून जोरदार स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
उद्घाटन सोहळ्याला भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, महिला अध्यक्ष धनश्री गिरी, नाशिक जिल्हा संघाचे सचिव विलास गायकवाड, रत्नागिरीचे सचिव सिद्धेश गुरव, सिंधुदुर्गचे सचिव कुणाल हळदणकर, मुंबई उपनगरचे संदीप पाटील, हिंगोलीचे जिल्हा सचिव मझर आदी मान्यवर उपस्थित होते.

महासचिव मीनाक्षी गिरी यांनी टेनिस क्रिकेटच्या वाढत्या संधी व आगामी राष्ट्रीय स्पर्धांविषयी मार्गदर्शन केले. स्पर्धेत मुलांचे १५ आणि मुलींचे ७ संघ सहभागी झाले.
अंतिम सामन्यात हिंगोलीचा दबदबा
रोमहर्षक अंतिम सामन्यात हिंगोली संघाने नाशिक संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात सांगलीने रायगडचा पराभव करत प्रथम क्रमांक मिळवला; रायगडला उपविजेतेपद तर नाशिकला तृतीय क्रमांक मिळाला.
उत्तम प्रदर्शनाबद्दल कन्हैया गुजर (अध्यक्ष), मीनाक्षी गिरी (महासचिव), विलास गिरी, धनश्री गिरी आदी मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. पंच म्हणून संदीप पाटील, धनंजय लोखंडे, सोम बिरादार, दर्शन थोरात, मानस पाटील, हर्षवर्धन चौधरी, देवेंद्र बागुल, सत्यम पांडे, धनश्री गिरी, साक्षी गणे, रुतुजा तोरडमल, रोहिणी सकटे यांनी काम पाहिले.
दरम्यान, राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा येथे आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईचे संघ या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पुरस्काराचे मानकरी
– मालिकावीर : शेख जमीर शब्बीर (हिंगोली)
– सर्वोत्तम फलंदाज : शेख जमीर शब्बीर (हिंगोली)
– सर्वोत्तम गोलंदाज : मुन्ना पंडित (नाशिक)



