शालेय विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाचा दबदबा

  • By admin
  • November 2, 2025
  • 0
  • 115 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, छत्रपती संभाजीनगर विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय १९ वर्षे मुले-मुली विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धा राजे संभाजी सैनिक शाळा, कांचनवाडी (पैठण रोड) येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुलांचे व मुलींचे दोन्ही संघ उत्कृष्ट कामगिरी करत २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत नागपूर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी स्लगरला बॉल मारून केले. यावेळी क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, क्रीडा अधिकारी खंडुराव यादव, बीडचे क्रीडा मार्गदर्शक रेवणनाथ शेलार, प्रा. गणेश बेटूदे, मुख्याध्यापिका कविता कराड, क्रीडा शिक्षक संतोष आवचार, सचिन बोर्डे, क्रीडा शिक्षिका अमृता शेळके, सादत खान, नीलेश माने, कृष्णा दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन्ही संघांच्या पात्रते बद्दल जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष डॉ फुलचंद सलामपुरे व सचिव गोकुळ तांदळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेसाठी बाहेरील विभागातून पंच बोलावण्यात आले होते. सोमनाथ सपकाळ, भीमा मोरे, रोहित तुपारे, यश थोरात, निखिल वाघमारे, गौरव साळवे, कार्तिक तांबे यांनी पंच म्हणून उत्कृष्ट भूमिका निभावली.

योग्य नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. आता राज्यस्तरावर छत्रपती संभाजीनगर विभागातील संघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

स्पर्धेचे निकाल

मुले – १९ वर्षे गट ः प्रथम : छत्रपती शिवाजी प्रीपरेटरी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, द्वितीय : साने गुरुजी निवासी शाळा, बीड, तृतीय : देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर शहर.

मुली – १९ वर्षे गट ः प्रथम : गायकवाड ग्लोबल स्कूल, द्वितीय : साने गुरुजी निवासी शाळा, बीड, तृतीय : रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल, छत्रपती संभाजीनगर शहर.

अंतिम सामन्यांचे निकाल

मुलांचा सामना : छत्रपती शिवाजी प्रिपरेटरी (ग्रामीण) यांनी साने गुरुजी निवासी शाळा, बीडचा १२–१० (होमरन फरकाने) पराभव करून विजेतेपद पटकावले.

मुलींचा सामना : गायकवाड ग्लोबल स्कूल (ग्रामीण) यांनी साने गुरुजी निवासी शाळा, बीडचा १६–१५ (होमरन फरकाने) पराभव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *