मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप, आरएमएमएस व सरस्वती हायस्कूल वर्गमित्र मंडळातर्फे विश्व मास्टर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमधील ६६ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेते क्रीडापटू दत्तात्रय उतेकर यांच्या गौरवार्थ ८ नोव्हेंबर रोजी १४ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे परेल येथे आयोजन करण्यात आले आहे.
वर्गमित्राच्या अभिमानास्पद कामगिरीचा यथोचित गौरव करण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, माजी आमदार सुभाष बने आदी विशेष प्रयत्नशील आहेत.
आमदार सचिनभाऊ अहिर व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने ही स्पर्धा ७, ८, १०, ११, १३, १४ वर्षाखालील मुला-मुलींच्या ६ वयोगटात स्विस लीग पद्धतीच्या किमान ४ फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुध्दिबळ पट व घड्याळ दिली जाणार आहेत.
एकूण १२० विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्काराने गौरविण्यात येईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे व्हॉटसअॅपवर ४ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा.



