वॉशिंग्टन सुंदरची वादळी फलंदाजी, भारताचा दमदार विजय

  • By admin
  • November 2, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

तिसऱ्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव, मालिकेत १-१ बरोबरी

होबार्ट ः भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा टी-२० सामना होबार्ट येथे खेळवण्यात आला. यात टीम इंडियाने ५ विकेटने विजय मिळवला. वॉशिंग्टन सुंदरच्या वादळी फलंदाजीच्या बळावर भारताने हा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. 

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकात ६ विकेट गमावून १८६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने १९ व्या षटकात हे लक्ष्य सहज गाठले. वॉशिंग्टन सुंदरने या सामन्यात ४९ धावांची शानदार खेळी केली. या विजयासह पाच सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

टिम डेव्हिडचे वादळी अर्धशतक 
नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. त्यांना पहिल्या तीन षटकात दोन धक्के सहन करावे लागले. अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्या दोन षटकात ट्रॅव्हिस हेड आणि जोश इंगलिसला बाद केले. त्यानंतर कर्णधार मिचेल मार्श आणि टिम डेव्हिड यांनी ३५ चेंडूत तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. डेव्हिडने सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने स्टोइनिससोबत पाचव्या विकेटसाठी २७ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली. डेव्हिडने ३८ चेंडूत ७४ धावा केल्या, ज्यामध्ये आठ चौकार आणि पाच षटकार मारले. त्यानंतर स्टोइनिसने सहाव्या विकेटसाठी मॅथ्यू शॉर्टसोबत ३९ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकार मारून ६४ धावांची भागीदारी केली. शॉर्ट १५ चेंडूत २६ धावांवर आणि झेवियर बार्टलेटने तीन धावांवर नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन बळी घेतले, तर वरुण चक्रवर्तीने दोन बळी घेतले.

वॉशिंग्टन सुंदरची सामना जिंकून देणारी खेळी 
भारतीय संघानेही पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. अभिषेकने १६ चेंडूत २५ धावा केल्या. गिलने १२ चेंडूत १५ धावांची खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने ११ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले. तिलक वर्माने २६ चेंडूत २९ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर याने सामना जिंकणारी खेळी केली. जितेश शर्माही शेवटपर्यंत नाबाद राहिला. वॉशिंग्टन सुंदरने २३ चेंडूत ४९ धावा काढत नाबाद परतला. जितेश शर्माने १३ चेंडूत २२ धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियासाठी विजयी धावा जितेश शर्माच्या बॅटने आल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, नाथन एलिसने तिथे सर्वाधिक ३ बळी घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *