महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार
मुंबई ः महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या बहुचर्चित निवडणुकीला नाट्यमय वळण लागले. विद्यमान अध्यक्ष अजित दादा पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठी थेट रिंगणात उडी घेतल्याने या निवडणुकीची देशात चर्चा झाली. उच्चस्तरीय बैठकांतून यात मार्ग काढण्यात आला. विद्यमान अध्यक्ष अजितदादा पवार यांची चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
रविवारी (२ नोव्हेंबर) निवडणुकीसाठी मतदान होणार होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा, बैठकांमुळे रविवारी सर्व उमेदवारांनी स्वखुशीने अर्ज माघारी घेतले. निवडणूक रिंगणात एकही उमेदवार न राहिल्याने निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची एजीएम घेण्यात आली आणि यात अजितदादा पवार यांना सर्वाधिकार देण्यात आले. येत्या २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे वृत्त आहे. ही कार्यकारिणी जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व क्रीडा संघटना पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
या प्रसंगी माजी मंत्री सतेज पाटील, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भाषणे झाली. २० कार्यकारिणी आणि ८ नियुक्त पदाधिकारी अशी २८ संघटकांची पदाधिकारी म्हणून निवड केली जाणार आहे. सचिवपदासाठी नामदेव शिरगावकर आणि संजय शेटे हे दोन उमेदवार रिंगणात होते. या पदासाठीची निवडणूक सर्वात चर्चेचा मुद्दा राहिली.
अजितदादा पवार म्हणाले की, डीपीडीसीला २२ हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यातील एक टक्का रक्कम खेळासाठी खर्च करू शकतात असे मी सर्वांना सांगितले आहे. ही रक्कम २२० कोटी इतकी होते आणि ही रक्कम खेळाच्या विकासासाठी उपयोगात आणता येईल.
बालेवाडी क्रीडा संकुलात राज्य क्रीडा स्पर्धांना हॉस्टेल, हॉलसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही असे पाहण्याची सूचना अजितदादांनी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना केली. तसेच हॉटेल ऑर्चिड येथे दरवर्षी किती रुम्स उपलब्ध करुन देऊ शकतात एमओयूच्या माध्यमातून हे पाहण्याची सूचना देखील अजितदादांनी क्रीडामंत्र्यांना यावेळी केली. बालेवाडी हॉस्टेल नीट करुन द्यावे असेही यावेळी त्यांनी सांगितले.
बजेटमध्ये तरतूद वाढवणार
आगामी आर्थिक बजेटमध्ये मी क्रीडा खात्याचे बजेट १ हजार कोटी रुपये करणार आहे. जे सध्या ६०० कोटी रुपये आहे असे अजितदादा पवार यांनी सांगितले.
दत्तक योजना राबवणार
मोठ्या कॉर्पोरेट यांचा सीएसआर फंडमधून खेळांना दत्तक देण्याबाबत चर्चा करणार, शब्द टाकणार असे अजितदादा यांनी सांगितले. गरज वाटत असल्यास क्रीडा संघटनांना धर्मादाय आयुक्तांकडे लागणाऱया विलंबाबाबत कॅबिनेट मधून मार्ग काढू (चेंज रिपोर्ट बाबत) असे अजितदादा पवार यांनी सांगितले.
बैठकीला उपस्थिती
या बैठकीला अजितदादा पवार, मुरलीधर मोहोळ, माणिकराव कोकाटे, सतेज पाटील, नामदेव शिरगावकर, संजय शेटे, प्रशांत देशपांडे, आदिल सुमारीवाला, अरुण लखानी, उदय डोंगरे, दत्ता आफळे, किरण चौगुले, मनोज भोयर, शैलेश टिळक, राजीव देसाई, अशोक पंडित, स्मिता यादव, आशिष बोडस, चंद्रजित जाधव, राजेंद्र निंबाळते, मुणगेकर, प्रदीप खांड्रे, दयानंद कुमार, सोपान कटके, निलेश जगताप, संदीप ओंबासे, प्रदीप गंधे, सतीश इंगळे, मनोज कोटक, आशिष फडणीस, राकेश तिवारी आदी उपस्थित होते.



