मुंबई ः चेन्नई येथील विनायक मिशन्स रिसर्च फाऊंडेशनमध्ये नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना पुरुष आणि महिला गटाची जेतेपद मिळवताना दुहेरी मुकूटाचा मान संपादन केला.
या स्पर्धेत पुरुष संघाने १२३.३० गुण आणि महिला संघाने ७८.५५ गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला. मुंबईच्या पुरुष संघात समर्थ राणे,शार्दुल ऋषिकेश, मृगांक पाठारे, अवधूत पिंगळे, करण विश्वकर्मा, निशांत लोखंडे यांचा समावेश होता. तर महिला संघात जानव्ही जाधव, श्रुती उटेकर, पलक चुरी, प्रांजली सावंत, निधी राणे, मैथिली शिरवडकर या होत्या.
वैयक्तिक स्पर्धेत निशांत याने रौप्य तर समर्थने कांस्य पदकाची कमाई केली. महिला गटात वैयक्तिक विभागात पलकने दोन सुवर्ण, जानव्हीने दोन रौप्य, एक कांस्य आणि निधीने एक कांस्य पदक मिळवले. पुरुष संघाचे आदित्य पाटील आणि महिला संघाची हेमानी परब प्रशिक्षक होते. या संघाच्या यशाबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचे खास अभिनंदन केले आहे.



