छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा शटल बॅडमिंटन असोसिएशन आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योनिक्स–सनराईज जी एच रायसोनी मेमोरियल मराठवाडा ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जल्लोषात पार पडला. यंदाच्या स्पर्धेत उदयन देशमुख आणि श्रावण दुधले यांनी प्रत्येकी दोन गटांत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट आपल्या नावावर केला.
ऋतुपर्ण कुलकर्णी बॅडमिंटन अकॅडमीच्या अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात सानप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती अमित सानप यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते ऋतुपर्ण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुहेरी मुकुटाची जोरदार कमाई
उदयन देशमुख याने १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अनुज निर्वळ याचा २१-८, २१–१४ असा पराभव करुन विजेतेपद पटकावले. तसेच उदयन याने १५ वर्षांखालील दुहेरीत (यश मोरेसोबत) लाविश मुळे आणि श्रेयस जाधव यांच्यावर २१–१२, २१–१५ अशी मात केली.
श्रावण दुधले याने पुरुष एकेरीत सुजल पवारवर २१–१२, २१–११ असा विजय नोंदवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पुरुष दुहेरीत (निनाद कुलकर्णी सोबत) निकेत वराडे आणि सुजल पवार जोडीवर २१–१३, २१–१० असा विजय मिळवला.
३५० प्लस खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
रायसोनी फाउंडेशनच्या सहयोगाने पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटांतून ३५० हून अधिक तरुण खेळाडूंनी सहभाग नोंदवला. उदयोन्मुख प्रतिभांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अमित सानप यांनी आयोजक संघटनेचे कौतुक केले. तसेच, भविष्यातही अशा स्पर्धांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न
प्रास्ताविक अतुल कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन हिमांशू गोडबोले यांनी केले. मुख्य पंच म्हणून मिलिंद देशमुख यांनी भूमिका बजावली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, उपाध्यक्ष विरेन पाटील, कोषाध्यक्ष नितीन इंगोले, तसेच प्रभाकर रापतवार, जावेद पठाण, परीक्षित पाटील, सचिन कुलकर्णी, चिरायू चौधरी, सत्यबोध टाकसाळी, विजय भंडारे, निकेत वराडे, निनाद कुलकर्णी, अर्णव बोरीकर, सदानंद महाजन यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
उत्कृष्ट खेळ, उच्च दर्जाचे आयोजन आणि विजेत्यांची दमदार कामगिरी यामुळे मराठवाडा ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा संस्मरणीय ठरली. विजेत्यांनी आगेकूच करत राज्य-राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवावी, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
अंतिम सामन्यांचे इतर निकाल
९ वर्षांखालील मुले : अनुज स्वामी – समर्थ नाईकवाडे (२१–१६, २१–१३)
११ वर्षांखालील मुले : अमेय माढेकर – आरव कासट (२१–१२, २१–१०)
११ वर्षांखालील मुली : अनन्या अंभोरे – दिव्या चौधरी (२१–८, १७–२१, २१–१९)
१३ वर्षांखालील मुले : विशेष श्रीवास्तव – अभिनव पालकर (२१–१४, २१–१७)
१३ वर्षांखालील मुली : सिद्धी सानप – अवनी कुलकर्णी (२१–१६, २१–१२)
१५ वर्षांखालील मुले : आदित येणगेरेड्डी – आरव इंगोले (११–२१, २१–१८, २१–१०)
१३ वर्षांखालील मुले दुहेरी : आरुष साठे/फाझल शेख – अजितसिंग बायस/साई शहाणे (२१–१८, २१–१६).
१७ वर्षांखालील मुले दुहेरी : राज शितोले/रुद्रप्रताप पाटील – आदित रेड्डी/ओंकार निकम (२१–१७, २१–१६)
महिला एकेरी : सारा साळुंके – अनुष्का विधाते (२१–११, २१–१०)



