बीड : शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षांखालील मुला-मुलींची राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा बीड येथील जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉलमध्ये भव्य सोहळ्यात सुरू झाली.
स्पर्धेचे उद्घाटन विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी विक्रम काळे म्हणाले, “बीडची क्रीडा संस्कृती मजबूत होत असून जिल्ह्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडत आहेत. खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.”
आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन बीडला मिळाल्याबद्दल क्रीडा संचालकांचे आभार मानले व विविध जिल्ह्यांतून आलेल्या खेळाडूंचे स्वागत केले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी खेळाडूंना निवास, भोजन व मैदानाची उत्कृष्ट सुविधा पुरविल्याचे सांगितले.
राज्यातील ८ विभागांतील ८ मुलांचे आणि ८ मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या निवड चाचणीतून महाराष्ट्राचा संघ निश्चित होऊन ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान बेरेलि (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग, व्हॉलीबॉल संघटना व स्वयंसेवकांनी मोठे प्रयत्न केले आहेत.



