कोल्हापूर ः कोल्हापूरचा उदयोन्मुख टेनिसपटू संदेश दत्तात्रय कुरळे यांनी मुंबईत झालेल्या १ लाख एआयटीए राष्ट्रीय चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेत ओपन गटात उपविजेतेपद पटकावून चमकदार कामगिरी बजावली.
प्रत्येकी उच्च मानांकित खेळाडूंवर मात करत संदेशने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात संदेशने करारी लढत दिली, परंतु त्याला निरोव शेट्टीकडून ४-६, ७-६(२), ०-६ असा पराभव स्वीकारावा लागला. दुसरा सेट टायब्रेकरमध्ये जिंकत सामना निर्णायक तिसऱ्या सेटकडे नेण्याचा संदेशचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला.
स्पर्धेतील संदेशने पहिल्या फेरीत सक्षम चव्हाणवर ८-१ अशी दणदणीत मात केली. प्री-क्वार्टरफायनलमध्ये विश्वजीत सणसवर ६-२, ६-४ विजय नोंदवत आगेकूच केली. उपांत्यपूर्व फेरीत कनिष्क जेटलीवर ६-२, ६-१ अशी सरळ सेट्समध्ये मात करुन त्याने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत संदेशने दीप मुनीमवर ४-६, ७-६ (१), ६-२ असा विजय नोंदवला.
कोल्हापूरचा रहिवासी असलेला संदेश अर्शद देसाई टेनिस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक मनाल देसाई आणि अर्शद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संदेशने सातत्यपूर्ण कामगिरी करत या स्पर्धेत चमक दाखवली.संदेशच्या या यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, पुढील मोठ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी तो एक मजबूत दावेदार म्हणून उदयास आला आहे.



