११ ते १६ नोव्हेंबरदरम्यान देश-विदेशातील बुद्धिबळपटूंची मेळावा
नाशिक : नाशिकच्या क्रीडा इतिहासातील एक ऐतिहासिक पर्व उलगडत असून, पहिल्यांदाच “नाशिक बुद्धिबळ महोत्सव” ११ ते १६ नोव्हेंबर दरम्यान भव्यदिव्य स्वरूपात होत आहे. चतुरंग गुरुकुलम आणि रिव्होल्यूशनरी चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सहा दिवसांच्या महोत्सवात देशभरातील नामांकित बुद्धिबळपटू सहभागी होत आहेत. महाराष्ट्राच्या क्रीडामंत्र्यांच्या जिल्ह्यात होणारी ही भव्य स्पर्धा नाशिकच्या क्रीडा नकाशावर एक मैलाचा दगड ठरणार आहे.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल रेटिंग स्पर्धा, ज्यामध्ये ९० मिनिटांचे वेळ नियंत्रण आणि प्रत्येक चालीवर ३० सेकंदांची इन्क्रिमेंट असेल. या स्पर्धेत एकूण ३ लाख रुपये रोख बक्षीस तसेच ८८ ट्रॉफी देण्यात येणार आहेत. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळविण्याची किंवा विद्यमान रेटिंग वाढविण्याची सुवर्णसंधी यामुळे उपलब्ध होणार आहे.
देशातील महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान यांसह अनेक राज्यांमधून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. यासोबतच, काही निवडक परदेशी महासंघांनीही सहभागाची तयारी दर्शविली असून, नाशिकमध्ये आजवरची ही सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महोत्सवाचे प्रायोजक प्रगती एंटरप्रायझेस आणि अंजनेय ज्योतिष केंद्र असून, उत्साहात भर घालत रॅपिड आणि ब्लिट्झ अशा दोन नॉन-रेटेड स्पर्धादेखील घेण्यात येणार आहेत. या दोन्ही स्पर्धांचे एकत्रित बक्षीस मूल्य तीन लाख रुपये व १०० ट्रॉफी असेल.
बुद्धिबळाची स्थानिक संस्कृती समृद्ध करणे, युवा पिढीला प्रेरित करणे आणि नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. भारताच्या मानाच्या बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराती यांच्या जिल्ह्यात — पुढील ग्रँडमास्टर शोधण्याच्या ध्येयाने काही तरुण अभियंत्यांनी सामाजिक उपक्रमातून उभारलेल्या या स्पर्धेचे महत्व विशेष आहे, असे चतुरंग गुरुकुलमचे संस्थापक अध्यक्ष संदीप नागरे यांनी सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रिव्होल्यूशनरी चेस क्लबचे प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच पुष्कर जाधव, वरद देव, गणेश ताजणे, वैभव देशमुख, प्रमोद गंधगोळ, चैतन्य दिवेकर, निलेश बहलकर, दिपाश्री चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी पुष्कर जाधव (९५६१६ ३६५३०) आणि वैभव देशमुख (७०२०४ ५४६३५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



