भविष्याची गरज म्हणून मानसिक आरोग्य जपा

  • By admin
  • November 4, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

– प्रा. भरत कोळी, शारीरिक शिक्षण तथा क्रीडा समन्वयक, शिरपूर.

आजकालच्या समाजाची जीवनशैली ही नेहमीचं बदलत्या काळानुसार आगळी-वेगळी बघायला मिळते, त्यात २१ व्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात तर मानव हा अधिकाधिक आरामदायी जीवनशैलीच्या शोधात तंत्रज्ञानावर बऱ्यापैकी अवलंबून राहत असल्याचे चित्र एका अहवालात समोर आलं आहे. म्हणजेच सक्रिय  राहण्याकडे कल हा कमी झाला आणि मानवाच्या बऱ्यापैकी हालचाली कमी झाल्या, हालचाली होतात तर त्या तंत्रज्ञानाच्या आधारेचं. उदाहरण – पायऱ्या चढण्याऐवजी लिफ्टचा वापर, थोड्या अंतरावर जाण्यासाठी बाईकचा वापर. मग दैनंदिन व्यवहारात अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टीं आहेत की मानव हा जीवन जगताना नको तिथं तंत्रज्ञानाचा आधार घेत स्वतःचं आरोग्य दररोज टांगणीला टांगतो आणि हे सत्यचं आहे, वाढता बेसुमार मोबाईल(सोशल मीडिया) वापर, कामाचा अतिताण, स्पर्धात्मक जीवनाचा अति अवलंब, मग अशामुळं कुठंतरी आनंद हरतोय आणि नैराश्याचा विजय होतोय ही परिस्थिती सध्या तरी दिसतेय. 

विशेष म्हणजे मी असं मुळीचं म्हणत नाही की तुम्ही तंत्रज्ञानाचा संपूर्ण त्याग करा, पण स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे विशेष ते आपल्याला ओळखता आलेच पाहिजे. खरंतर आजचं युग हे तंत्रज्ञानाशिवाय मुळीचं नाही, जर तुम्हाला २१ व्या आधुनिक शतकात जर टिकायचं असेल तर तंत्रज्ञान हे जमलंच पाहिजे. त्याशिवाय भविष्याची प्रगती नाही हे मात्र तितकंच खरं. पण थोडे गांभीर्याने स्वतःला एक प्रश्न नक्कीचं विचारायला हवं की आपण या आधुनिक युगात आपल्या दैनंदिन व्यवहारात तंत्रज्ञानाचा किती वापर करायला हवा..? अतिवापर तर होत नाही ना..? तेव्हा नक्कीच कुठंतरी आपल्याला मानसिक आरोग्याबाबतीत समज येईल असं तरी मला वाटतं. कारण आजच्या काळात एक मोठी समस्या आपल्यासमोर येऊन उभी राहिली आहे ती म्हणजे ‘नैराश्य आणि मानसिक आरोग्य’ ज्यामुळे आपला युवा पिढीला या समस्यांनी फार ग्रासलेलं दिसतं आणि हे मी सांगत नाही तर असे अनेक अहवाल सांगतात, जे मानसिक आरोग्याबाबत भविष्यातील एक भयंकर परिस्थिती असेल असं ठामपणे सांगते, आणि सत्य स्थिती आहे म्हणून याकडे दुर्लक्ष न करता भविष्यातील मानसिक आरोग्याबाबतीत थोडी काळजी आपणचं घ्यायला हवी असं तरी मला वाटतं, जर भविष्यात स्वतःची प्रगती साधायची असेल तर प्रामुख्याने स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष देणं ही आपली प्राथमिक जवाबदारी आहे तर स्वतःला सुदृढ ठेवणं, त्यासह मानसिक आरोग्य जपणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण जीवनाच्या प्रत्येक स्थितीत (अडचण, समस्या) मानसिक आरोग्य जर उत्तम किंवा स्थिर असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हवं ते करू शकता इतकं सामर्थ्य मानसिक आरोग्यामध्ये असल्याने तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, विशेष म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक समग्र असं शारीरिक, भावनिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक आरोग्य असेल तर यशाचं शिखर तुम्ही सहज गाठू शकता आणि फार महत्वाचे पैलू आहेत हे लक्षात घेता भविष्यासाठी मानसिक आरोग्य जपणं हे फार गरजेचं आहे.

चांगले मानसिक आरोग्य हे व्यक्तीला नेहमीचं स्थिर राहण्यास मदत करते,अर्थात जीवनात अनेक गोष्टीं घडतात मग या गोष्टी घडत असतांना काही अर्थी येणारा ताणतणाव हाताळण्यास स्थिर मानसिक आरोग्य मदत करते. त्यामुळं इतरांशी (लोकांशी चांगले संबंध ठेवण्यास किंवा प्रस्थापित होण्यास) मदत मिळते. जर स्वतःचं मानसिक आरोग्य चांगले असेल तर आपल्या दैनंदिन व्यवहारातील अनेक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास आपण सक्षम होऊ शकतो असे अनेक बहुफायदे मानसिक आरोग्याचे आहेत, म्हणून सर्वांनी थोडं स्वतःच्या मानसिक आरोग्याकडं लक्ष द्यावं, मोबाईलचा अतिवापर टाळावा, दैनंदिन व्यवहारात सक्रिय असं शारीरिक श्रम करावं, पुरेशी व वेळेवर योग्य ती झोप घ्यावी, शारीरिकदृष्ट्या आपल्या आवडत्या कामात सक्रिय रहावं, त्यात मैदानावरचे खेळ किंवा मनोरंजनात्मक खेळ खेळावे, व्यायामाला प्राधान्य द्यावे, स्वतःच्या कामात आनंदी रहावं, इतरांशी सकारात्मक बोलावं (संवाद साधा), तुम्हाला गरज वाटल्यास इतरांची व्यावसायिक मदत घ्यावी, सामाजिक उपक्रम किंवा इतर कार्यात सक्रिय सहभाग नोंदवा ज्यामुळं मानसिक आरोग्यासाठी अशा सोप्या-सोप्या सवयींचा अवलंब करत स्वतःचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवता येतं, खरंतर आपण आजचं आनंदी जीवनशैलीचा अवलंब केला तर भविष्यातील मानसिक आरोग्य उत्तम राहिलं, सध्याच्या युगात स्पर्धात्मक संघर्ष अधिकचं वाढलेला दिसतो त्यात वाढते मोबाईलचे व्यसन, व्यायामाकडे दुर्लक्ष, संतुलित आहाराकडे पाठ, फास्ट-फूड धाव, तरुण पिढीचे व्यसनाकडे लक्ष, छोट्या-छोट्या गोष्टींचा ताणतणाव अशामुळं मानसिक आरोग्य खराब होत नैराश्य येते आणि भविष्यासाठी यशाची वाटचाल थांबते, म्हणून नैराश्य टाळण्यासाठी व मानसिक आरोग्य जपण्यासाठी कुटुंबाला व मित्रांना वेळ देणं फार गरजेचं व आवश्यक असतं ज्यामुळं तुमचं नैराश्य टळू शकतं आणि तुम्हाला जर नैराश्याची लक्षणे जाणवत असतील,तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला  घेणं महत्वाचं आहे,वेळेवर मानसिक आरोग्याविषयक समुपदेशन घ्या,कारण नैराश्य हा एक उपचार करण्यायोग्य असा मानसिक आजार आहे, तो बरा होऊ शकतो.

मानसिक आरोग्य जपण्यासाठी

१) शारीरिक सक्रियता ठेवा –
‘मानसिक आरोग्य’ टिकविण्यासाठी दैनंदिन व्यवहारात शारीरिक सक्रियता फार महत्वाची असते,जर तुम्ही शारीरिक सुदृढ असाल तर मानसिक स्थिरता उत्तम लाभते आणि त्यामुळं तुम्ही ठरवलेलं काम/कार्य पूर्णत्वास येते,म्हणून शारीरिक उपक्रमात सहभागी होऊन शारीरिक सक्रियता ठेवण्यास प्राथमिकता द्या हे फार गरजेचं आहे.

२) सामाजिक उपक्रम व संबंध चांगले ठेवा –
आपल्या जीवनात कुटुंब व मित्र यांचा फार मोलाचा वाटा असतो,अर्थात तुमच्या वाईट किंवा संघर्षाच्या काळात अगदी जवळून आधार देणारे एकतर कुटुंब किंवा मित्र असतात,त्यामुळं आपल्या वेळेतून त्यांना वेळ देणं हे फार गरजेचं असतं आणि हे स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे पैलू मानले जाते,त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणं सुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते,संबंध चांगले असले की संवाद हा चांगला होतो,अर्थात मनातल्या काही गोष्टींची चर्चा जवळच्या लोकांशी झाल्या की मनावरचं ओझं हलकं होतं(ताणतणाव कमी होतो) म्हणून संवाद झाला पाहिजे,त्याचबरोबर सामाजिक उपक्रमात निःस्वार्थ सहभाग सुद्धा आपण नोंदविला पाहिजे, यामुळं भावनिक आधार आपल्याला मिळतो.

३) पुरेशी झोप घेणे –

दैनंदिन व्यवहारात अनेक गोष्टींमुळे आपल्याला शारीरिक व मानसिक थोडाफार थकवा येत असतो,पण हल्ली आजच्या पिढीला सोशल मिडियाचा अतिवापरामुळे मुलांची योग्य ती झोप होत नाही,त्यामुळं मानसिक आरोग्य (नैराश्य) सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे, म्हणून दररोज किमान ८ तास पुरेशी झोप घेणे हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

४) नियमित व्यायाम करावा –

हल्ली शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे हवी ती ताकद, क्षमता शरीरात दिसत नाही आणि त्यामुळं शारीरिक व्याधी निर्माण होतात, म्हणून दिवसभरातून वेळात-वेळ काढून नियमित शारीरिक हालचाल केल्या पाहिजे (व्यायाम), नियमित व्यायाम केल्याने शारीरिक क्षमता सुधारतात आणि ताण-तणाव कमी होतो, शारीरिक आरोग्य चांगले राहते त्यामुळेचं मानसिक आरोग्य हे भविष्यासाठी उत्तम ठरू शकते.

५) वेळेचं व्यवस्थापन करावं –
ह्या स्पर्धात्मक युगात वेळ कुणाचं कडे शिल्लक नाही, पण थोडं आपण स्वतःला वेळ देणं अपेक्षित आहे असं तरी मला वाटतं किमान दिवसभरातून एक तास स्वतःच्या आवडी-निवडीला (छंद) वेळ दिला पाहिजे. त्यामुळं मनावरचं ओझं कमी होतं म्हणून दैनंदिन व्यवहारातील कामाचे आणि विश्रांतीचे योग्य नियोजन करणं सुद्धा मानसिक आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते जेणेकरून मनावर ताण निर्माण होणार नाही.

६) संतुलित व सकस आहार –

‘आरोग्य हिचं धनसंपदा’ हे वाक्य लक्षात ठेवून आपण भविष्यात कुठं असणार आहोत हे लक्षात घ्यावं अर्थात उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सकस, पौष्टिक व संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे, फास्ट-फूड संस्कृतीकडे जाऊन स्वतःच्या शरीर संपत्तीचा नायनाट न करता चौरस आहाराकडे लक्ष केंद्रित करावं जेणेकरून शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं राहिलं.

७) भावनिक समतोल ठेवा –
भावनांशी संबंधित किंवा भावना दर्शवणारे आरोग्य म्हणजे भावनिक आरोग्य होय,व्यक्तीच्या भावना सहजपणे प्रकट होऊ शकतात,भावनिक असण्यामध्ये आनंद,दुःख,राग किंवा भीती यांसारख्या भावनांचा समावेश असतो,त्यामुळं आपल्या जीवनशैलीत भावनांवर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने नियंत्रण असले पाहिजे अर्थात शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यामध्ये समतोल असेल तर भविष्यात आपण सकारात्मकपणे ध्येय आणि उद्दिष्टे गाठू शकतो.

८) आनंदी राहण्यास प्राधान्य द्या –
या आधुनिक युगात जगण्यासाठी नुसतं पैसा गरजेचा नाही तर पैशासोबत आनंद,समाधान फार महत्वाचं असतं आणि त्यामुळं जीवन जगताना प्रत्येक गोष्टींत आजच्या स्थितीत आनंदी राहणे फार गरजेचं असतं. विशेष म्हणजे आनंदी राहण्यासाठी, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, जीवनात नेहमी सकारात्मक लोकांशी मैत्री करा आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत रहा, त्यामुळं जीवनात आनंद निर्माण होत असतो ही न दिसणारी भावाना आहे पण समाधान नक्कीच आहे,तसेच जीवनात आपल्या गरजांना प्राधान्य देणं फार गरजेचं असतं, त्याचबरोबर आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवणं आपले छंद जोपासणे यांसारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर आपण जीवनात आनंदी राहू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *