सातारा येथे २० ते २३ नोव्हेंबर राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन – मोहन खोपडे
पुणे : भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघामार्फत प्रतिष्ठेची ‘हिंद केसरी’ किताब लढत तसेच ५२ वी पुरुष आणि ४ थी महिला राष्ट्रीय अजिंक्यपद शैली कुस्ती स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान छत्रपती साहू महाराज स्टेडियम, सातारा येथे होणार आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड करण्याकरिता महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी पुणे येथे होणार आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय महासचिव गौरव रोशनलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कुस्ती संकुल, पुणे (पो. वडकी, ता. हवेली) येथे ही निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
निवड चाचणी खुल्या पद्धतीने घेण्यात येणार असून पुरुष व महिला गटात विविध वजन गटात स्पर्धा होईल. स्पर्धेदरम्यान रेफ्रींनी भारतीय शैली कुस्तीचे नियम अचूकपणे अमलात आणावेत यासाठी पंच व मार्गदर्शक प्रशिक्षण शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे. ऑलिम्पियन, अर्जुन पुरस्कार विजेते कृपाशंकर पटेल आणि ऑलिम्पियन, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त ग्यानसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते ९ नोव्हेंबर रोजी पुण्यात हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
या शिबिरात सहभागी पंचांना पंच किट, टी-शर्ट व प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असून, शिबिर पूर्ण केलेल्या पंचांना राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन खोपडे यांनी सांगितले.


