जळगाव ः जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (एआयसीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे पुरस्कृत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दोन दशकानंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा होईल. या जागतिक बुद्धिबळपटूंसाठी आकर्षण केंद्र असलेल्या स्पर्धेत जळगाव येथील जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांना सहाय्यक पंच म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्ती जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) यांनी केली आहे.
प्रवीण ठाकरे यांनी यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई व वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. विश्वचषक स्पर्धेत असा बहुमान मिळवणारे उत्तर महाराष्ट्रातील प्रवीण ठाकरे पहिलेच बुद्धिबळ पंच आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय बुद्धिबळ संघाचे सल्लागार आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी विशेष कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, नरेंद्र फिरोदिया, विनय बेले, पी बी भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले आहे.
दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ महासंग्रामात ८० पेक्षा जास्त देशांचा सहभाग असून, २०६ खेळाडू अधिकृतरित्या खेळणार आहेत. खुल्या गटातील या स्पर्धेत बाद फेरीचा अवलंब केला जात असल्याने अतिशय उत्कंठावर्धक व रोमहर्षक सामने अनुभवण्याची संधी बुद्धिबळ प्रेमींना लाभत असते. भारताकडून डी गुकेश, प्रग्नानंदा, अर्जुन इरिगेसी, विदित गुजराथी, अरविंद चिदंबरम, दिव्या देशमुख सारखे कसलेले खेळाडू सहभागी होत असून जगभरातून अनिश गिरी, वेस्ली सो, नोदरबेक अब्दुसत्तारोव, इयान नेपोमियाशी, व्हिन्सेंट केमर, लियोन आरोनियन यांसारखे दिग्गज व अनुभवी खेळाडू देखील या स्पर्धेत आपले कसब पणाला लावतील.
जगातील सर्वोत्तम २०६ बुद्धिबळपटू त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक व नियुक्त केलेले पंच या सर्वांची चोख व्यवस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या स्पर्धा व्यवस्थापन समितीने व गोवा शासनाने केली आहे. या जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या जळगाव जिल्ह्यातील व्यक्तीस हा बहुमान प्राप्त व्हावा, ही महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेमींसाठी खचितच अभिमानास्पद बाब आहे.
या त्यांच्या यशासाठी जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर के पाटील, नरेंद्र पाटील, संजय पाटील, यशवंत देसले, तेजस तायडे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


