छत्रपती संभाजीनगर ः फिनिक्स सोशल वेलफेअर फाउंडेशन संचलित फिनिक्स रँडोनियर्स यांच्या वतीने आयोजित १००० किलोमीटर आणि ६०० किलोमीटर अंतराच्या सायकलिंग ब्रेवेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बुलढाणा, अमरावतीसह राज्यातील सायकलपटूंनी दमदार कामगिरी करत यशाची नवी शिखरे सर केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित १००० किलोमीटर ब्रेवेटमध्ये शहरातील नामांकित सायकलिस्ट मनीष खंडेलवाल यांनी निखिल कचेश्वर यांच्या निरीक्षणाखाली अद्वितीय कामगिरी केली. ७५ तासांची मर्यादा असलेली ही ब्रेवेट त्यांनी केवळ ५४:०० तासांत पूर्ण करून उत्कृष्ट सहनशक्ती, जिद्द आणि मानसिक बळाचे दर्शन घडवले.
दरम्यान, आयर्नमॅन दर्शन घोरपडे यांच्या देखरेखीखाली झालेल्या ६०० किलोमीटर ब्रेवेटमध्ये दहा सायकलपटूंनी यशस्वीरीत्या कामगिरी नोंदवली. या ब्रेवेटसाठी निश्चित वेळ ४० तास होती. प्रखर ऊन, बोचरा वारा, रात्रीचा अंधार आणि दोनशे किलोमीटरचा अवकाळी पाऊस अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणाचा सामना करत सर्व सायकलपटूंनी ही मोहीम यशस्वी केली. या यशामुळे नवोदित सायकलपटूंना प्रेरणादायी ऊर्जास्रोत मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगर – तुळजापूर महामार्ग व जालना महामार्ग या मार्गावर आयोजित या आव्हानात्मक राईडमध्ये सहभागी सायकलपटूंनी दाखवलेले संयम, आत्मविश्वास आणि चिकाटी उल्लेखनीय अधोरेखित झाली.
६०० किलोमीटर ब्रेवेट पूर्ण करणारे सायकलपटू
प्रशांत भावसार (३६:२३ तास), गिरीश गोडबोले (३८:५३ तास), मल्लिकार्जुन स्वामी (३९:०८ तास), संजय राठोड (३९:३८ तास), संतोष सानप (३९:३८ तास), शिवाजी राजे (३९:४६ तास), लक्ष्मण साळुंखे (३९:४६ तास), हेमंत भावसार (३९:४६ तास), ओम जाधव (३९:५३ तास), शिवाजी गोलैत (४०:०० तास).
या सर्व सायकलपटूंनी महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वात छत्रपती संभाजीनगरचा मान वाढवला असून राज्यातील विविध क्रीडा संस्था व संघटनांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.या ब्रेवेट स्पर्धेमुळे शहरातील एंड्युरन्स सायकलिंग संस्कृती अधिक बळकट झाली असल्याचे आयोजकांनी नमूद केले.



