अहिल्यानगर येथे खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ
अहिल्यानगर ः शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित आणि अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा स्टेशन रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात उत्साहात सुरू झाली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनुप देशमुख यांच्या हस्ते बुद्धिबळपटावर चाल देऊन संपन्न झाले.
या प्रसंगी सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त शाम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, स्वप्निल भंगुरकर, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, रोहित आडकर, देवेंद्र ढोकळे, तसेच पंच विनिता श्रोत्री, श्रद्धा विचवेकर, पवन राठी, शार्दुल टापसे, शिरीष इंदुरकर, विजय चोरडिया, प्रवीण जोशी यांच्यासह खेळाडू, पालक व नागरिक उपस्थित होते.
सचिव बापट यांनी प्रास्ताविक करताना माहिती दिली की, स्पर्धेसाठी देशभरातून २७० खेळाडू सहभागी झाले असून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल अशा राज्यांतील बुद्धिबळपटू स्पर्धेत ताकद आजमावणार आहेत.
स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर आदित्य डिंगरा (हरियाणा), राहुल संगमा (गुजरात), अनुप देशमुख (महाराष्ट्र) यांच्यासह दिग्गज खेळाडूंचा समावेश असल्याने स्पर्धा उच्च दर्जाची आणि रोमहर्षक होणार आहे.
“ग्रँडमास्टर घडवण्याचा संकल्प”
अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, “साडे–पाच वर्षांपासून ते ८३ वर्षांपर्यंतच्या बुद्धिबळपटूंसाठी खुली असलेली ही स्पर्धा प्रतिभावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी आहे. शहरातून अधिकाधिक ग्रँडमास्टर घडावेत, हा आमचा संकल्प आहे आणि ही स्पर्धा त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल.”
पारुनाथ ढोकळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रकाश गुजराथी यांनी आभार मानले. स्पर्धेमुळे नगरमध्ये बुद्धिबळाच्या नव्या युगाची सुरूवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



