डेक्कन क्लिफहॅंगर अल्ट्रा सायकल रेसमध्ये ‘देवगिरी वॉरियर्स’ संघ उपविजेता
छत्रपती संभाजीनगर ः इन्स्पायर इंडिया यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘डेक्कन क्लिफहॅंगर’ अल्ट्रा सायकल रेस २०२५ मध्ये देवगिरी सायकलिंग क्लबच्या ‘देवगिरी वॉरियर्स’ या तीन सदस्यीय रिले संघाने उल्लेखनीय कामगिरी करत मिश्र वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे देवगिरी क्लबचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील वर्चस्व आणखी अधोरेखित झाले.
ही रोमांचक आणि आव्हानात्मक शर्यत १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ५:३९ वाजता पुण्यातील केशवबाग येथून सुरू झाली आणि २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:२७ वाजता गोव्याच्या बोगमालो बीचवर यशस्वीरीत्या पूर्ण झाली. ६४३ किमीचे अंतर संघाने केवळ ३० तास ४३ मिनिटांत पूर्ण करत उपांत्य स्थान पटकावले.
अत्यंत कठीण मार्गावर विजय
पुणे-महाबळेश्वर-सातारा-फलटण-विटा-कराड-अनुसकुरा घाट (धोकादायक उतार)-धारवाड-सावंतवाडी-मडगाव-बोगमालो, गोवा या मार्गावरील खडतर घाट, तापमानातील बदल आणि रात्रभर केलेली सायकल राइड या सर्व आव्हानांवर मात करून देवगिरी वॉरियर्सने दमदार कामगिरी साकारली.
विजयी संघाची शान
सुजित सौंदळगेकर, अश्विनी लहाने व आनंद तारके या तिघांनी सामूहिक समन्वय, फिटनेस, मानसिक ताकद आणि चिकाटीच्या जोरावर उपांत्य क्रमांक पटकावला.
संघाच्या यशामागे देवगिरी सायकलिंग क्लबचे अध्यक्ष पांडुरंग लहाने यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व महत्वपूर्ण ठरले. त्यांनी क्रू सपोर्ट मेंबर म्हणून संपूर्ण रेसदरम्यान रणनीती, पोषण, विश्रांती व्यवस्थापन आणि रूट प्लॅनिंगची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
अध्यक्ष पांडुरंग लहाने म्हणाले की, “देवगिरी वॉरियर्सने जिद्द, शिस्त आणि टीमवर्कच्या जोरावर हे यश मिळवून दिले. हा फक्त विजय नाही, तर औरंगाबादसाठी अभिमानाचा क्षण आहे.”


