टी-२० मालिकेत भारताची आघाडी

  • By admin
  • November 6, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी दणदणीत विजय, अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी निर्णायक

क्वीन्सलँड : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत दमदार पुनरागमन करत चौथा सामना ४८ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकत मालिकेची सुरुवात केली होती, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर टीम इंडियाने सलग दोन विजय नोंदवत मालिकेवर पकड मजबूत केली.

अक्षर पटेल ठरला ‘सामनावीर’
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ८ बाद १६७ धावा उभारल्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४६ धावा करून भक्कम सुरुवात केली. अभिषेक शर्माने २८ धावांचे योगदान दिले. मधल्या फळीतील फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. मात्र, अष्टपैलू अक्षर पटेलने २१ धावांची नाबाद खेळी करत धावसंख्या १६० च्या पुढे नेली.

यानंतर गोलंदाजीतही त्याने तितकेच प्रभावी प्रदर्शन करत ४ षटकांत फक्त २० धावा देत २ बळी टिपले आणि सामनावीर पुरस्कार पटकावला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि अ‍ॅडम झांपाने प्रत्येकी ३ गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळली
१६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. चार षटकांपर्यंत विकेट न गमावता फलंदाजी जमली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कडवी माऱ्याने यजमानांची गाडी रुळावरून घसरवली. ९ षटकांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ ९८ धावांवर तंबूत परतला. कर्णधार मिचेल मार्शने सर्वाधिक ३० धावा केल्या. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलिया १८.२ षटकांत ११९ धावांवर सर्वबाद झाला.

या विजयाने भारताने मालिकेत आघाडी मिळवत निर्णायक सामना रोमांचक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *