छत्रपती संभाजीनगर ः ईएमएमटीसीतर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेने होत असलेल्या ईएमएमटीसी – एमएसएलटीए १४ वर्षाखालील क्ले कोर्ट राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात मुलांच्या गटात स्मित उंद्रे, ऋषिकेश माने, अर्श कथुरिया, अंशुल पुजारी यांनी तर सृष्टी सूर्यवंशी, हर्षा ओरुगंती, अनिहा गव्हिनोल्ला, दीप्ती व्यंकटेशन, तनुश्री सतीश या नऊ मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकित ऋषिकेश माने याने अव्वल मानांकित उत्तर प्रदेशच्या कौस्तुभ सिंगचा ६-३, २-६, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव करून आपली सनसनाटी निकालाची मालिका कायम राखली.

महाराष्ट्राच्या अंशुल पुजारी याने आठव्या मानांकित आसामच्या निब्रास हुसेनचे आव्हान ६-१, ६-४ असे मोडीत काढले. दिल्लीच्या सहाव्या मानांकित अर्श कथुरियायाने कर्नाटकच्या चौथ्या मानांकित पुनीत एमचा ६-२, ६-२ असा पराभव केला.. सोळाव्या मानांकित महाराष्ट्राच्या स्मित उंद्रे याने बाराव्या मानांकित कर्नाटकच्या महेश रुनमानला ६-२, २-६, ६-४ असे पराभूत केले.

मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या सृष्टी सूर्यवंशीने पंधराव्या मानांकित कर्नाटकच्या इलायनीला के हिचा ६-१, ६-३ असा तर अकराव्या मानांकित आंध्रप्रदेशच्या हर्ष ओरुगंती हिने तेलंगणच्या सातव्या मानांकित झोहा कुरेशीचा टाय ब्रेकमध्ये ६-४, ४-६, ७-६ (६) असा पराभव केल. तेलंगणाच्या सोळाव्या मानांकित अनिहा गव्हिनोल्लाने तिसऱ्या मानांकित ओडिशाच्या शझफा एसकेवर ६-१, ३-६, ६-१ असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. तमिळनाडूच्या दीप्ती व्यंकटेशनने दहाव्या मानांकित क्रीशिका गौतमीचा ७-५, ६-१ असा पराभव केला..


