नितीन घोरपडे यांचे मलेशियात ऐतिहासिक यश

  • By admin
  • November 7, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

नितीन घोरपडे दहाव्यांदा आयर्नमॅन किताबाचे मानकरी, कफील जमाल यांनी पटकावला आयर्नमॅन किताब

छत्रपती संभाजीनगर ः मेहनत, शिस्त आणि चिकाटी असेल, तर अशक्य काहीच नाही – या विश्वासाची पुन्हा उजळणी करत छत्रपती संभाजीनगरचे आयर्यमॅन नितीन घोरपडे आणि कफील जमाल यांनी जगप्रसिद्ध आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेत चमकदार यश संपादन केले. मलेशियातील निसर्गरम्य लंकावि बेटावर १ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या आव्हानात्मक स्पर्धेत दोघांनीही भारताचा गौरव उंचावला.

ही स्पर्धा म्हणजे सहनशक्ती, मानसिक धैर्य आणि क्रीडाशिस्तीची कठोर परीक्षा. समुद्रात १.९ किमी पोहणे, दमट आणि उष्ण हवामानात ९० किमी डोंगराळ रस्त्यावर सायकलिंग (सुमारे ७९० मी. चढ समाविष्ट), त्यानंतर २१ किमी धावणे- असे एकूण ११३ किमी अंतर निश्चित वेळेत पार करणे म्हणजे खरेच लोहमनुष्यत्वाची कसोटी!

या आव्हानाला समर्थ उत्तर देत नितीन घोरपडे यांनी ०७:२९:४०, तर कफील जमाल यांनी ०७:४४:५७ वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली.

नितीन घोरपडे – दहाव्यांदा ‘आयर्नमॅन’!
आयर्नमॅन स्पर्धांमध्ये सातत्य आणि उत्कृष्टता साधण्याचा मान नितीन घोरपडे यांच्या नावावर कायम! नितीन घोरपडे यांनी आजवर १० आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून राज्याला आणि देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे:

आयर्नमॅन ७०.३ : गोवा (२०१९, २०२३, २०२४), बर्लिन इर्कनार (२०२५), मलेशिया (२०२५)

आयर्नमॅन १४०. ६ : हॅम्बर्ग-जर्मनी (२०१८), कोपनहेगन-डेन्मार्क (२०१९), टॅलिन-एस्टोनिया (२०२२, २०२३), इटली (२०२४)

कफील जमाल यांनीही गोवा आणि मलेशिया येथील २ आयर्नमॅन ७०.३ पूर्ण करत दमदार छाप सोडली आहे.

प्रेरणा घरातूनच!
नितीन घोरपडे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव दर्शन घोरपडे यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये स्वीडन – कलमार येथे झालेल्या आयर्नमॅन १४०.६ स्पर्धेत दमदार कामगिरी करून मराठवाड्यातील पहिला तरुण आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला.

लंकावि – सुंदर पण कठीण रणभूमी
लंकावि बेटाचे उष्ण, दमट व डोंगराळ हवामान ही स्पर्धा अधिक कठीण बनवते. शारीरिक ताकद, मानसिक निर्धार आणि आत्मविश्वास यांचा संगम असला कीच असे आव्हान पूर्ण करता येते – याची प्रचिती दोघांनीही आपल्या कामगिरीतून दाखवून दिली.

या संपूर्ण प्रवासात अहिल्यानगर सायकलिंग क्लबचे गौरव फिरोदिया आणि श्रीकांत यांनी दिलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या पाठबळामुळे दोघांनीही मलेशियाच्या भूमीवर भारताचा तिरंगा दिमाखात फडकावला.

जिल्ह्यातील विविध क्रीडा संस्था, मंडळे, संघटना व क्रीडाप्रेमी यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल नितीन घोरपडे आणि कफील जमाल यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

ही कहाणी केवळ स्पर्धा जिंकण्यापुरती नाही; ती स्वप्न, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणादायी गाथा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *