धुळे ः धुळे शहराचा शटलकॉकपटू ओम सुशीलकुमार बोरसे याची इटली येथे होणाऱ्या शटलकॉक विश्वचषक – इटालियन ओपन २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ७ ते ९ डिसेंबर २०२५ दरम्यान इटली येथे ही प्रतिष्ठेची स्पर्धा होणार आहे.
ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशियाची मान्यता असलेल्या शटलकॉक असोसिएशन ऑफ इंडिया संलग्न शटलकॉक असोसिएशन, हरियाणा आयोजित राष्ट्रीय शटलकॉक अजिंक्यपद व विश्वचषक निवड चाचणी स्पर्धा २०२५-२६ ही ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर रोजी रोहतक (हरियाणा) येथे झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी करून राज्याचा झेंडा उंचाविला.
ओम बोरसे याने वरिष्ठ मिश्र दुहेरीत सुवर्ण, मिश्र दुहेरी (पुरुष) आणि वरिष्ठ एकेरीत प्रत्येकी रौप्य अशी एकूण ३ पदके पटकावली. याशिवाय जित पाटील, शिव पाटील, धानी बोरसे, जिज्ञासा बोरसे आणि निर्मलकुमार बोरसे यांनीही विविध गटांत एकूण अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली.
या यशासाठी अशोक दुधारे (शटलकॉक असोसिएशन, महाराष्ट्र) व प्रेरणा बोरसे (सचिव, धुळे जिल्हा शटलकॉक असोसिएशन) यांचे मार्गदर्शन लाभले. ओमच्या निवडीमुळे धुळे जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे.



