सी के नायडू ट्रॉफी स्पर्धेत जळगावचा नीरज जोशी चमकला

  • By admin
  • November 7, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

महाराष्ट्र संघाच्या विजयात मोलाचे योगदान 

जळगाव ः सी के नायडू २३ वर्षांखालील ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सलामीचा फलंदाज जळगावच्या नीरज जोशी याने फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीत उत्कृष्ट कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

महाराष्ट्राचा पहिला सामना सौराष्ट्रविरुद्ध झाला. या सामन्यात महाराष्ट्राने चौथ्या डावात २०८ धावांचे लक्ष्य दहा विकेट्स राखून गाठत शानदार विजय मिळवला. या विजयात नीरज जोशीने पहिल्या डावात ३६ धावा तर दुसऱ्या डावात केवळ १४९ चेंडूत नाबाद १३४ धावांची मॅच विनिंग खेळी केली. यासोबतच दुसऱ्या डावात २ बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भर घातली. तामिळनाडू संघाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

तिसऱ्या सामन्यात इंदूर येथे मध्य प्रदेशविरुद्ध महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ४७५ धावांचे भक्कम स्कोअर उभारले. पुन्हा एकदा नीरज जोशीने प्रभावी खेळ करत १११ धावांचे शतक झळकावले. त्याला अनिरुद्ध साबळे (१०१), सचिन धस (७३) आणि हर्ष मोघावीरा (७१) यांनी उत्तम साथ दिली. 

प्रत्युत्तरात मध्य प्रदेश संघाने पहिल्या डावात २८१ धावा केल्या. फॉलो-ऑन मिळाल्यानंतर त्यांच्या अखिल यादव (१०२) आणि माधव तिवारी (१००) यांच्या शतकांमुळे पराभव टळला. महाराष्ट्राला २६४ धावांचे लक्ष्य मिळाले; मात्र संघ ६६ धावांवर गारद झाला आणि सामना अनिर्णित राहिला.

नीरज जोशीच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे एमसीए अपेक्स कौन्सिल सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी आणि कार्यकारिणीने कौतुक केले आहे. महाराष्ट्राचा पुढील सामना त्रिपुराविरुद्ध पुणे येथे २३ ते २६ जानेवारी दरम्यान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *