मुंबई ः सुरक्षा प्रबोधिनी, सिद्धिविनायक यांच्या कुमार, तर संघर्ष, प्रबोधिनी स्पोर्ट्स यांच्या कुमारी गटातील विजयाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन पश्चिम विभागाच्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला.
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने गजानन क्रीडा मंडळ व पार्ले स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पार्ले येथील प्ले ग्राऊंडवर सुरू झालेल्या कुमारांचा पहिल्या सामन्यात मालाडच्या सुरक्षा प्रबोधिनीने दहिसरच्या रत्नदीप कबड्डी संघाचा पराभव करीत विजयी सलामी दिली.
सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत विश्रांतीला २६-१४ अशी आघाडी घेणाऱ्या सुरक्षाने नंतर देखील तोच खेळ करीत या विजयावर शिक्कामोर्तब केले. राम गुप्ता, विराज घाणेकर यांचा चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळाला याचे श्रेय जाते. रत्नदीपच्या अभिषेक सरोज, शैलेश तारकाते यांचा खेळ संघाला विजयी करण्यात कमी ठरला.
दहिसरच्या सिद्धिविनायक मंडळाने मालाडच्या दत्तगुरु मंडळाला नमवत आगेकूच केली. पूर्वार्धात २१-११ अशी आश्वासक आघाडी घेणाऱ्या सिद्धिविनायक मंडळाला उत्तरार्धात दत्तगुरू संघाने विजयासाठी चांगले झुंजविले. नीरज बाईत, प्रभात चौधरी सिद्धिविनायक कडून, तर प्रशांत सावंत, निहार गावडे दत्तगुरु संघाकडून उत्तम खेळले.
कुमारी गटात गोरेगावच्या संघर्ष मंडळाने दहिसरच्या जगदंब मंडळाचा सहज पाडाव केला. पहिल्या डावात झंझावाती खेळ करीत संघर्षने २७-०८ अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आहे ती आघाडी टिकविण्यावर भर देत सावध खेळ केला. कुसुम कुरकी, दिशी कोपलकर यांच्या सुरुवातीच्या आक्रमक खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जगदंबची सायली पाटील बरी खेळली. गोरेगावच्या प्रबोधिनी स्पोर्ट्स संघाने यजमान पार्ले स्पोर्ट्स संघाचा धुव्वा उडविला तो आचल पाल, आशू यादव यांच्या सर्वांगसुंदर खेळामुळे. पार्लेची दीपाली गुरव बरी खेळली.
या स्पर्धेचे उद्घाटन द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त गणेश देवरुखकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार पराग आळवणी, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग, स्पर्धा आयोजन प्रमुख मिलिंद शिंदे उपस्थित होते.



