मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप, आरएमएमएस व सरस्वती हायस्कूल वर्गमित्र मंडळातर्फे वर्ल्ड मास्टर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमधील ६६ किलो वजनी गटातील सुवर्णपदक विजेते क्रीडापटू दत्तात्रय उतेकर यांच्या गौरवार्थ ८ नोव्हेंबर रोजी १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यातील फिडे गुणांकित सबज्युनियर बुद्धिबळपटूंसह ७० खेळाडूंमध्ये ही स्पर्धा परेल येथील आरएमएमएस वातानुकुलन सभागृहात रंगणार आहे. स्पर्धेला आमदार सचिनभाऊ अहिर, माजी आमदार सुभाष बने, क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांचे सहकार्य लाभले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे १९ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या वर्ल्ड मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमधील ६६ किलो वजनी गटात ७० वर्षीय दत्तात्रय उतेकर यांनी सुवर्णपदक पटकाविले. आपल्या वर्गमित्राच्या कौतुकास्पद कामगिरीचा यथोचित गौरव करण्यासाठी सरस्वती हायस्कूलच्या वर्गमित्रांनी शालेय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे. विजेतेपद पटकावण्यासाठी सिमृता बुब्न, अर्जुन पांचाळ, मेधांश बंगर, अविघ्न चौकेकर, रेहान तानवडे, युवीर शाह, शार्दुल दरेकर, रियान दोशी, मिहीत कदम, श्रीहान नलावडे, अहान श्रीवास्तव, आयांश पाटील, हृदान थावरे, कबीर खेडेकर, आरव कदम आदी खेळाडूंमध्ये चुरस आहे.
समारोप प्रसंगी हवाई दलाचे निवृत्त अधिकारी व विश्व सुवर्णपदक विजेते पॉवरलिफ्टर दत्तात्रय उतेकर यांचा शाल, श्रीफळ , सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.



