ग्रॅपलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला पाच पदके
मुंबई ः लौत्राकी, ग्रीस येथे ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या यूनायटेड वर्ल्ड रेसलिंग ग्रॅपलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जागतिक स्तरावर शानदार कामगिरी करत इतिहास घडवला. भारतीय खेळाडूंनी एक रौप्य व चार कांस्य पदके जिंकून भारताचा गौरव वाढवला आहे.
वेदश्री देशमुख हिने अंडर १५ गटात -४० किलो वजन गटात रौप्य व कांस्यपदक मिळवले. तर समर्थ घिवांदे याने अंडर १५ गटात -३५ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले. यशवंत सिंग यांनी -८४ किलो वजन गटात दोन कांस्यपदक पटकावले. याशिवाय, आयुष बोरस्ते याने अंडर १५ गटात -५९ किलो वजन गटात, साई देशमुख याने अंडर १५ मुलांच्या गटात -४७ किलो वजन गटात, धर्मेश प्रजापती याने अंडर १७ मुलांच्या गटात -६९ किलो वजन गटात आणि प्रिन्स याने अंडर २० मुलांच्या गटात -६६ किलो वजन गटात देशाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली.
भारतीय ग्रॅपलिंगच्या प्रगतीत आंतरराष्ट्रीय प्रमाणित यूडब्ल्यूडब्ल्यू रेफरी म्हणून संतोष देशमुख, नवीन रॉयल आणि सीमा राणा यांचा सहभाग विशेष ठरला. त्यांनी जागतिक स्तरावर भारताचे मान राखले आणि यूडब्ल्यूडब्ल्यू आंतरराष्ट्रीय रेफरी परीक्षा उत्तीर्ण करून आपली कौशल्य सिद्ध केली. ही कामगिरी भारतीय ग्रॅपलिंगसाठी सुवर्णक्षण ठरली असून, युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.



