रविवारपासून प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर ः पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहर येथे ३६ व्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे.
उद्घाटन सोहळा
स्पर्धेचे उद्घाटन १० नोव्हेंबर रोजी सायंकााळी पाच वाजता पोलीस आयुक्तालय येथील देवगिरी क्रीडा संकुलात होणार आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक ग्रामीण यांची प्रमुख उपस्थिती असेल. स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात ९ नोव्हेंबर रोजी रोजी होईल.
सहभागी संघ आणि ठिकाणे
छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण, बीड, जालना, आणि धाराशिव या पोलीस विभागांचे संघ व खेळाडू यात सहभागी होणार आहेत. स्पर्धा मुख्यत्वे पोलीस आयुक्तालय शहर येथील देवगिरी क्रीडा संकुल आणि भारत बटालियनचे ग्राउंड येथे घेण्यात येणार आहेत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या खेळांडूंसाठी भारत बटालियन मुख्यालय येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
खेळ प्रकार : या स्पर्धेत एकूण २० प्रकारचे क्रीडा प्रकार असतील.
देवगिरी क्रीडा संकुल येथे व्हॉलीबॉल, कबड्डी आणि खो-खो या स्पर्धांचे सामने होतील.
भारत बटालियनच्या ग्राउंडवर बास्केटबॉल, ॲथलेटिक्स, हँडबॉल, कुस्ती, ज्युदो, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, पॉवर लिफ्टिंग, तायक्वांदो आणि वुशू या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत.
जलतरण स्पर्धा सिद्धार्थ उद्यान जलतरण तलाव, महानगर पालिका या ठिकाणी होणार आहेत. स्पर्धा दररोज सकाळी सात ते अकरा आणि दुपारी २.३० ते ४.३० या दोन सत्रात घेण्यात येतील.
समारोप सोहळा
स्पर्धेचा समारोप १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेतील विजेते संघ व उत्कृष्ट खेळाडूंची राज्य क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त मुख्यालय शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रशासन सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे.



