छत्रपती संभाजीनगर ः महानगर पालिका छत्रपती संभाजीनगर, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि अमॅच्युअर सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या हार्देज् सॉफ्ट टेनिस अकॅडमी ऑफ इंडियामध्ये जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलचे मुख्याध्यापक डॉ आदित्य जोशी यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा क्रीडा अधिकारी शेख अकिब जावेद, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक निलेश हारदे, शिवाजीराव भोसले, राहुल हिवराळे, डॉ कल्याण गाडेकर आणि पंकज पेंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋषिकेश भोसले, श्रावणी हरदे व राष्ट्रीय पदक विजेते पारस फुरसुले, ओम काकड, आहिल कल्याणकर, मनस्वी राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
ही स्पर्धा १४, १७ आणि १९ वयोगटातील मुले-मुलींमध्ये बाद पद्धतीने खेळवली जात आहे. स्पर्धेत खेळाडू व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शालेय स्तरावरील सॉफ्ट टेनिसला नवे प्रोत्साहन मिळाले आहे.



