पुणे ः पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभागस्तरीय १९ वर्षांखालील सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन टी सी महाविद्यालय बारामती येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आबेदा इनामदार जुनिअर कॉलेज फॉर गर्ल्स संघाने पुणे ग्रामिण संघाचा १७-३ अशा होमरन्सने पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीच्या लढतीत संघाने अहिल्यानगर संघाचे आव्हान १२-८ असे मोडून काढताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
विभागीय स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर हा संघ नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. हे विजेतेपद संपादन करण्यात आबेदा इनामदार जुनिअर कॉलेज फॉर गर्ल्स संघाच्या आलिया शेख, खुशबू रे, यास्मिन शेख, अल्फीया अन्सारी, प्रतीक्षा झांम्पले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संघाने मिळवलेल्या यशासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव प्रा इरफान शेख, स्कूल समितीचे अध्यक्ष ऍड हनीफ शेख, प्राचार्या रोशन शेख, मार्गदर्शक डॉ गुलजार शेख, हसीना शेख, विष्णू जाधव यांनी अभिनंदन करताना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


