देशभरातील शालेय खेळाडूंसाठी आधुनिक उपकरणांचा नवा अध्याय

  • By admin
  • November 8, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

शालेय क्रीडा महासंघ आणि व्हेक्टर एक्स यांच्यात ऐतिहासिक भागीदारी

लखनौ (गौरव डेंगळे) ः शालेय क्रीडा महासंघ ऑफ इंडिया (एसजीएफआय) आणि व्हेक्टर एक्स या सुप्रसिद्ध क्रीडा उपकरण उत्पादक कंपनीमध्ये एक ऐतिहासिक करार झाला आहे. ‘सोकर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड’ ही व्हेक्टर एक्सची मूळ कंपनी असून ती भारतात ‘डनलॉप’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडची एकमेव वितरक आहे. या कराराद्वारे व्हेक्टर एक्स आणि डनलॉप यांना एसजीएफआयच्या सर्व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांसाठी “अधिकृत बॉल व उपकरण भागीदार” म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

लखनौ येथील फॉर्च्युन पार्क बीबीडी हॉटेलमध्ये झालेल्या या करार सोहळ्याला अनेक वरिष्ठ अधिकारी, मान्यवर आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. या करारावर शालेय क्रीडा महासंघाचे अध्यक्ष दीपक कुमार आणि सोकर इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

ही भागीदारी शालेय क्रीडाक्षेत्रातील दर्जा, उपलब्धता आणि मानकीकरण वाढविण्याच्या एसजीएफआयच्या उद्दिष्टासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे. व्हेक्टर एक्सकडून फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि हँडबॉल या खेळांसाठी अत्याधुनिक उपकरणांचा पुरवठा केला जाणार असून डनलॉपकडून टेनिस आणि स्क्वॉशसाठी अधिकृत बॉल उपलब्ध करून दिले जातील. तसेच या करारामध्ये शालेय पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सुविधा उन्नतीकरण, ब्रँडिंग आणि युवा विकास उपक्रमांचा समावेश देखील करण्यात आला आहे.

या भागीदारीबद्दल बोलताना शालेय क्रीडा महासंघाचे अध्यक्ष दीपक कुमार म्हणाले की, “ही भागीदारी भारतातील शालेय खेळाडूंसाठी नव्या युगाची सुरुवात आहे. एसजीएफआय भारतातील तरुण खेळाडूंच्या प्रतिभेला योग्य दिशा देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. दरवर्षी देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून ६०,००० हून अधिक खेळाडू ४४ क्रीडा प्रकारांतील २६५ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होतात. आम्ही व्हेक्टर एक्ससोबत मजबूत प्रणाली निर्माण करून खेळाडूंचा अनुभव समृद्ध करण्यासोबतच भारतीय शालेय क्रीडा जागतिक दर्जाशी जुळविण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

तर व्हेक्टर एक्सचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता यांनी सांगितले की, “शालेय क्रीडा महासंघासोबत भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. एसजीएफआय ही भारतातील सर्वात गतिशील आणि मोठी क्रीडा संस्था असून, तिच्या कार्यामुळे लाखो विद्यार्थी खेळात सहभागी होतात. या भागीदारीमुळे आम्हाला भारताच्या शालेय क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देता येईल आणि उद्याचे विजेते घडविण्यासाठी आपला हातभार लागू शकेल.”

२०२३ पासून दीपक कुमार यांच्या नेतृत्वाखाली एसजीएफआयने एक मोठे डिजिटल परिवर्तन अनुभवले आहे. मंत्रालयाच्या (क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय, भारत सरकार) मान्यतेने एसजीएफआय ही “डिजिटल पद्धतीने चालणारी, पारदर्शक आणि कार्यक्षम” राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून ओळखली जात आहे. सध्या एसजीएफआयच्या छत्राखाली ४५ राज्य संघटना कार्यरत आहेत आणि दरवर्षी देशभरात २६५ राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये ६०,००० पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग असतो, तसेच ५ लाखांहून अधिक प्रमाणपत्रे “डीजीलॉकर” या डिजिटल प्रणालीद्वारे वितरित केली जातात.

डिजिटल सुधारणा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एसजीएफआयने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. खेळाडूंच्या नोंदणीसाठी आता आधार क्रमांकाशी लिंक केलेली प्रणाली लागू करण्यात आली असून बायोमेट्रिक पडताळणीद्वारे नोंदणी अधिक पारदर्शक करण्यात आली आहे. ‘ऑटोमेटेड मॅनेजमेंट सिस्टम’च्या माध्यमातून स्पर्धांचे निकाल तत्काळ ऑनलाइन उपलब्ध केले जात आहेत. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानकांनुसार क्रीडा नियमांचे अद्ययावतीकरण करून २०१७ पूर्वीच्या नियमानांऐवजी नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

एसजीएफआयने आर्थिकदृष्ट्या आपली स्थिती मजबूत करत विविध प्रकल्पांना चालना दिली आहे. सुमारे दीड कोटी रुपयांहून अधिक निधी थेट शालेय क्रीडा स्पर्धांसाठी वितरित करण्यात आला आहे. त्याचबरोबर व्हेक्टर एक्ससोबतची भागीदारी आणि सशक्त विकास फाउंडेशनच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांद्वारे शालेय खेळांना नवे प्रोत्साहन मिळणार आहे. या निधीच्या माध्यमातून शाळा पातळीवरील School Pro Leagues आणि Excellence Centres स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या कराराची मुदत प्रारंभी दोन वर्षांची असून, दोन्ही संस्थांच्या संमतीने ती पुढे वाढवता येईल. एसजीएफआय आणि व्हेक्टर एक्स या भागीदारीमुळे भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, समान संधी आणि व्यावसायिकता वाढवून ऑलिंपिक दर्जाच्या खेळाडू घडविण्यासाठी मजबूत पायाभरणी केली जाणार आहे.

या भागीदारीच्या निमित्ताने शालेय खेळांना नवे आयाम प्राप्त होतील, तसेच ग्रामीण व शहरी भागातील शालेय खेळाडूंना दर्जेदार साधने आणि संधी मिळतील, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *