पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआय पुरुष राज्य ‘अ’ करंडक २०२५-२६ एलिट “अ” गटातील लीग सामन्यांसाठी महाराष्ट्र अंडर-२३ पुरुष संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा ९ ते २१ नोव्हेंबर २०२५ दरम्यान रांची येथे पार पडणार आहे. एमसीएचे मानद सचिव कमलेश पिसाळ यांनी हा संघ जाहीर केला.
जाहीर केलेल्या संघात राज्यातील प्रतिभावंत आणि दमदार कामगिरी करणाऱ्या १६ खेळाडूंचा समावेश आहे. दिग्विजय पाटील कर्णधारपदी, तर निरज जोशी उपकर्णधारपदी निवडले गेले आहेत. दोन विकेटकीपरसह समतोल संघ निवडण्यात आला आहे.
महाराष्ट्र अंडर-२३ पुरुष संघात दिग्विजय पाटील (कर्णधार), निरज जोशी (उपकर्णधार), अनिरुद्ध साबळे, सागर पवार, साहिल औताडे, किरण कोरमाले, हर्ष मोगावीरा, अजय बोरुडे, शुभम दासी, राजवर्धन हंगरगेकर, वैभव धारकुंडे, प्रथमेश गावडे, श्रेयस चव्हाण, रोशन वाघसारे, अभिषेक पवार, यश बोरामणी यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे सामने चंदीगड (९ नोव्हेंबर), बडोदा (११ नोव्हेंबर), उत्तराखंड (१३ नोव्हेंबर), बिहार (१५ नोव्हेंबर), पंजाब (१७ नोव्हेंबर), बंगाल (१९ नोव्हेंबर) आणि छत्तीसगड (२१ नोव्हेंबर) या संघांविरुद्ध होणार आहेत. उपांत्य सामने २९ नोव्हेंबर आणि अंतिम सामना १ डिसेंबर रोजी होणार आहे.
एमसीएने निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून येणाऱ्या सामन्यांसाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. या संघाकडून राज्य क्रिकेटप्रेमींना उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.



