अहिल्यानगर येथे राज्य कुमार-मुली अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

  • By admin
  • November 8, 2025
  • 0
  • 76 Views
Spread the love

धाराशिव ः महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन २०२५-२६ सालची ५१वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा अहिल्यानगर येथील विश्वंभरा प्रतिष्ठान व अक्षय दादा कर्डिले युवा प्रतिष्ठान बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत अहिल्यानगर येथील श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बुऱ्हाणनगर येथे आयोजित केली आहे.

यातून कर्नाटक येथे होणाऱ्या ४४व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक संघातील खेळाडू निवडीसाठी ही प्रमुख स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी कुमार-मुली १८ वर्षाखालील म्हणजेच ५ जानेवारी २००८ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेले असावेत. तसेच कुमार-मुलीसाठी वय (वर्ष) उंची (सेमी) वजन (कि ग्रॅ) २५० असे मूल्यांकन असेल.

कुमार-मुली खेळाडू जास्तीत जास्त बीए, बीकॉम, बीएससी प्रथम वर्ष अथवा त्याखालील वर्गात शिकत असला पाहिजे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जे कुमार-मुली दहावी उत्तीर्ण आहेत त्यांनी त्यांचे दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट व जे १२ उत्तीर्ण व त्याखालील इयत्तेत आहेत, त्यांनी दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे.

संलग्न जिल्हा संघानी आपली नोंदणी एक डिसेंबर २०२५ पर्यंत maharashtrakhokhoassociation@gmail.com या मेलवर विहित नमुन्यात पाठवून द्यावी, असे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ चंद्रजीत जाधव यांनी कळविले आहे. राज्यातील संलग्न जास्तीत जास्त संघानी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *