मुंबई ः स्वराज्य स्पोर्टस् , नवशक्ती स्पोर्ट्स या संघांनी कुमारी गट, तर सिद्धार्थ मंडळ, हिड इंडिया यांनी ४३व्या मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन (पूर्व व पश्चिम) जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागात तिसरी फेरी गाठली आहे.
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने गजानन क्रीडा मंडळ व पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार पराग आळवणी, आयोजक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पार्ले येथील प्ले ग्राऊंड वर सुरू झालेल्या पूर्व विभागातील कुमारी गटाच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात कांजूरमार्गच्या स्वराज्य स्पोर्ट्स संघाने विक्रोळीच्या लालबत्ती मंडळाला ४७-१३ असा धुव्वा उडविला.
नुकत्याच बहारीन येथे झालेल्या आंतर राष्ट्रीय युवा कबड्डीची सुवर्ण पदक विजेती सेरेना म्हसकर हिच्या झंझावाती खेळा पुढे विरोधी संघ अगदीच दुबळा वाटला. यात तिला मधुरा सावंतची मोलाची साथ लाभली. लालबत्तीची वैष्णवी दाडे थोडी बरी खेळली. याच विभागात दुसऱ्या सामन्यात चेंबूरच्या नवशक्ती स्पोर्ट्स संघाने घाटकोपरच्या नवरत्न अकादमी संघाला २४-१३ असे पराभूत करीत तिसरी फेरी गाठली. श्वेता शिद्रुक, किरण शिद्रुक यांच्या पूर्वार्धातील उत्कृष्ट खेळाने ही किमया साधली. नवरत्नच्या शर्वरी लांबे, श्रेया शिगवण यांनी उत्तरार्धात कडवी लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडल्या.
कुमार गटाच्या दुसऱ्या सामन्यात मुलुंडच्या सिद्धार्थ मंडळाने चेंबूरच्या बालवीर स्पोर्ट्स संघावर ३२-२६ अशी मात केली. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात १६-११ अशी सिद्धार्थकडे आघाडी होती. संकेत यादव, अमरजित राजभर सिद्धार्थ कडून, तर रोहित सुनार, साई भोसले बालवीर कडून उत्कृष्ट खेळले.
दुसऱ्या सामन्यात चेंबूरच्या हिड इंडिया संघाने घाटकोपरच्या वीर परशुराम संघाला २५-२२ असे नमवित आगेकूच केली. १४-११ अशी आघाडी घेणाऱ्या हिड इंडिया संघाला दुसऱ्या डावात विजयासाठी चांगले झुंजविले. अनिकेत धारा, संस्कार पाताडे यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाने हिड इंडियाने हा विजय साकारला. वीर परशुरामच्या धीरज भागने, प्रवीणकुमार कोंडा यांनी दुसऱ्या डावात कडवी लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले.



