मुंबई ः महाराष्ट्र तसेच बँक स्पोर्टस् बोर्डाचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विजय पाटील यांचे अल्पशा आजाराने ७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले. निधना समयी ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
लोअर परेलच्या वंदे मातरम् क्रीडा मंडळाकडून त्यांनी कबड्डी खेळाला सुरुवात केली. एक उत्कृष्ट उजवा मध्यरक्षक अशी त्याची ख्याती होती. त्याने मुंबई संघाचे तसेच महाराष्ट्राचे देखील प्रतिनिधित्व केले होते. सेंट्रल बँकेत कबड्डी खेळाडू म्हणून रुजू झाल्यानंतर त्याने बँक स्पोर्टस् बोर्ड संघाचे देखील प्रतिनिधित्व केले. कबड्डी खेळा बरोबर सामाजिक कार्यात देखील तो अग्रेसर होता. सेंट्रल बँकेत स्थानीय लोकाधिकार तो कार्यरत होता. करिरोड सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळात देखील तो काम करीत असे. दुपारी ३-३०च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील भोईवाडा येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कबड्डीतील एक गुणी खेळाडू हरपला.



