राज्य कबड्डी स्पर्धा
पुणे ः नाशिक शहर, पुणे ग्रामीण, नंदुरबार, परभणी यांनी किशोरी गटात तर जालना, परभणी यांनी किशोर गटात ३६ व्या किशोर किशोरी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीत धडक दिली.
पिंपरी चिंचवड बोपखेल येथील श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान संघ व विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत गतविजेत्या नाशिक शहर संघाने किशोरी विभागात रायगडचा ३४-२७ पराभव केला. हेतल हिरे व धनश्री शिंदे यांच्या धारधार चढाया त्यांना मिळालेली दिपिका मौर्या त्रिशना निमजे यांची पकडीची साथ यामुळे नाशिक शहर संघाने पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात रायगडच्या अर्पिता चौहान, मलिका शिंदे यांनी कडवी लढत देत सामन्यातील रंगत वाढविली. पुणे ग्रामीण संघाने साताऱ्याचा ६६-२८ धुव्वा उडवला. सानवी शिंदे, मानसी गावडे, सई जाधव यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

किशोर विभागात गतविजेत्या परभणी संघाने नंदुरबार संघाला नमवत उप उपांत्य फेरी गाठली. परभणीचा बालाजी राठोड, राहुल चव्हाण, सुनील कुमार कांबळे यांच्या खेळाने विजय साकारला. नंदुरबारकडून शंतनु म्हस्के, संभव बनकर यांनी शर्थीची लढत दिली.
दुसऱ्या सामन्यात जालन्याने सातारा संघाचा आरामात पराभव केला. निलेश राठोड, शिवाय गायकवाड, रोहन राठोड यांच्या चौफेर खेळाने पहिल्या डावात एक लोण देणाऱ्या जालना संघाने दुसऱ्या डावात ३ लोण देत मोठा विजय साकारला. नंदुरबार संघाकडून शिवम देसाई, आर्यन चव्हाण बरे खेळले.
किशोर गटात पराभव स्वीकारत असताना किशोरी गटात मात्र नंदुरबारने पुणे शहर संघाला ३३-३१ असे चकवित आगेकुच केली. त्यांनी पूर्ण डावात १७ बोनस गुण कमविले. त्यामुळे त्यांना हा निसटता विजय मिळविता आला. निविता बोगती, वैष्णवी ठिगळे यांच्या झंजावती चढायांनी हा विजय शक्य झाला. पुणे शहरच्या रिया लावर्डे, निलम जाधव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी लढत दिली. याच विभागात परभणी संघाने कोल्हापूर संघाला नमविले. परभणीकडून सोनाली नवकीकर, यशश्री इंगोले, श्रावणी इंगोले तर कोल्हापूरकडून सायली कस्तूरे, सुहानी पाटील, कृष्णा वर्मा यांचा खेळ प्रेक्षणिय झाला.



