लहू, प्रियंकाला रौप्यपदक, तर आर्याला कांस्यपदक
कन्नड (प्रवीण थोरात) ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, छत्रपती संभाजीनगर क्रीडा कार्यालय व छत्रपती संभाजीनगर ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्यूदो हॉल येथे नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर विभागीय शालेय ज्यूदो स्पर्धेत दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे व गावाचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धेत लहू मातेरे व प्रियंका गायकवाड यांनी प्रत्येकी रौप्य पदक तर आर्या पवार हिने कांस्यपदक मिळवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणीचा झेंडा उंचावला. विद्यार्थ्यांच्या या यशामागे राष्ट्रीय खेळाडू तथा शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण थोरात यांचे क्रीडा मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर विभागीय स्तरावर पदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
शाळेचे मुख्याध्यापक विकास पुरी तसेच शिक्षक प्रवीणकुमार अहिरे, सुरज जाधव, शंकर वळवळे, विशाल अंबाडे आणि कृष्णा चव्हाण यांनी या विद्यार्थिनींच्या तयारीसाठी मोलाचे योगदान दिले. या सर्वांच्या सहकार्यामुळेच धामणी शाळा ग्रामीण भागातून पुढे येऊन विभागीय क्रीडाक्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करत आहे.
या विजयी विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सहाय्यक क्रीडा अधिकारी रामकिसन मायंदे, गटशिक्षणाधिकारी सबाहत मॅडम, विस्तार अधिकारी डी टी शिंदे, मनीष दिवेकर, केंद्र प्रमुख कौतिकराव सपकाळ व केंद्रीय मुख्याध्यापक विजय साळुंखे सरपंच सोनाबाई दुधे, उपसरपंच पोपट हिंगे, किसन मातेरे, सुभाष मातेरे, योगेश निर्मळ, गणेश सुराशे यांनी कौतुक व अभिनंदन केले.



