मुंबई ः प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने भंडारी हॉल, गुहागर येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या निलांश चिपळूणकर याने मुंबईच्या माजी राष्ट्रीय विजेत्या संदीप देवरूखकरला सहज दोन सेटमध्ये हरवून स्पर्धेत खळबळ माजवली. तर महिला एकेरीच्या उप उपांत्य फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने मुंबईच्या उर्मिला शेंडगेवर चुरशीचा विजय मिळवला. तिने उपांत्य फेरी गाठताना उर्मिलाचा २५-१२, १०-२० , २५-१२ असा पराभव केला.
महिला एकेरी उप उपांत्य फेरीत आकांक्षा कदम (रत्नागिरी) हिने ममता कुमारी (मुंबई) हिचा पराभव केला. सोनाली कुमारी (मुंबई) हिने प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) हिला पराभूत केले. रिंकी कुमारी (मुंबई) हिने चैताली सुवारे (ठाणे) हिच्यावर विजय साकारला.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीत सागर वाघमारे (पुणे), विकास धारिया (मुंबई) व पंकज पवार (ठाणे) यांनी आपली विजयी आगेकूच कायम ठेवताना अनुक्रमे अभिषेक चव्हाण (रत्नागिरी), संजय मांडे (मुंबई) आणि राजेश गोहिल (रायगड) यांचा पराभव केला.



