पुणे ः पुणे ग्रामीण, परभणी या संघांनी ३६व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत किशोर व किशोरी गटाचे विजेतेपद मिळविले. परभणीचे जेतेपदाचे सलग दुसरे वर्ष आहे.
पिंपरी चिंचवडच्या बापखेल येथील श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाने अहमदनगरचा ३९-२० असा लिलया पराभव केला. आक्रमक सुरुवात करणाऱ्या पुण्याने पहिला लोण देत पूर्वार्धात १९-१० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आपल्या खेळातील जोश कायम राखत दुसरा लोण दिला. मानसी गावडे, धुविता माने यांच्या धारदार चढायाना सई जाधवची मिळालेली पकडीची साथ यामुळे हा विजय सोपा गेला. मुंबई शहर पश्श्चिम, नाशिक ग्रामीण या बलाढ्य संघाना पराभूत करणाऱ्या अहमदनगरला अंतिम सामन्यात मात्र ही किमया साधता आली नाही. त्यांच्या ज्ञानेश्वरी ढवण, फौजीया शेख, श्रेया अडसुळ यांचा खेळ या सामन्यात बहारला नाही.
किशोर गटाच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या परभणीने पालघरला ४२-३० असे नमवले. पहिल्या डावात दोन्ही संघानी एकमेकाचा अंदाज घेत खेळ केल्याने विश्रांतीला गुणफलक १५-१४ असा परभणीकडे झुकला होता. दुसऱ्या डावात मात्र जोरदार मुसंडी मारत परभणीने २ लोण देत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. राहुल चव्हाण, विजय तारे यांच्या चौफेर चढाया त्यांना दिपराज कांबळे, सुनिलकुमार कांबळे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. पालघरच्या विनीत पाचलकर, ध्रुव डोंगरे, निशांत बाईत यांचा पहिल्या डावातील जोश दुसऱ्या डावात दिसला नाही.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण विधान सभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अर्जुन पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर, राष्ट्रीय जेष्ठ खेळाडू वासंती सातव-बोर्डे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू घुले, शोभा भगत, संगीता सोनावणे, नितीन घुले देखील उपस्थित होते.


