मुंबई ः मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या ४३व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुलुंड केंद्र, सिद्धार्थ मंडळ, जय लहुजी, ओवाळी मंडळ यांनी पूर्व, तर श्रीकृष्ण मंडळ, हिड इंडिया, पारले महोत्सव अकादमी, श्री सिद्धिविनायक यांनी पश्चिम विभागात कुमार गटाची उपांत्य फेरी गाठली.
गजानन मंडळ व पार्ले महोत्सव स्पोर्टस् अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार पराग आळवणी, आयोजक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्ले येथील प्ले-ग्राउंडवर हे सामने सुरू आहेत. पूर्व विभागातील कुमारांच्या उपउपांत्या फेरीत मुलुंड क्रीडा केंद्राने विक्रोळीच्या महाड तालुका संघाचा सहज पाडाव केला. रितेश शेट्टी, सोहम धायकर यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. महाड तालुक्याचा समर्थ कुंभार बरा खेळला. मुलुंच्या सिद्धार्थ मंडळाने घाटकोपरच्या यंग स्पोर्ट्स संघावर मात केली. संकेत यादव, अमरजित राजभर यांच्या धुव्वाधार खेळाने हे साध्य झाले.
याच विभागात घाटकोपरच्या जय लहुजी संघाने कुर्ल्याच्या स्वस्तिक मंडळाला पराभूत केले. सुशील सिंग, अथर्व इंगोले जय लहुजी यांच्याकडून, तर अमित चव्हाण, गुड्डू सहानी उत्कृष्ट खेळले. शेवटच्या सामन्यात घाटकोपरच्या ओवाळी मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्राला, नमविले. मंगेश कदम, राकेश कुंभार यांचा चढाई पकडीच्या खेळाला याचे श्रेय जाते. चेंबरचा चिराग पाटील चमकला.
पश्चिम विभागातील कुमारांच्या उप उपांत्य सामन्यात अंधेरीच्या श्रीकृष्ण मंडळाने मालाडच्या सुरक्षा प्रबोधिनी संघाला पराभूत केले. अक्षय गोरे, सचिन सकपाळ श्रीकृष्ण कडून, तर राम गुप्ता, अनिकेत आहिरे सुरक्षा कडून उत्कृष्ट खेळले. कुरारच्या हिड इंडिया संघाने सांताक्रूझच्या अष्टविनायक मंडळावर सहज विजय मिळविला तो तेजस लंबर, योगेश विश्वकर्मा यांच्या झंझावती खेळाच्या जोरावर. पराभूत संघाचा अविनाश पाटील बरा खेळला.
अभिषेक यादव, अभिषेक मोहिते यांच्या झंझावाती खेळाच्या जोरावर यजमान पार्ले महोत्सव स्पोर्टस् अकादमीने मालाडच्या वंदे मातरम संघाचा धुव्वा उडवला. शेवटच्या सामन्यात दहिसरच्या श्री सिद्धिविनायक संघाने जोगेश्वरीच्या जॉली स्पोर्ट्स संघाचा आरामात पराभव केला. ओम कुदळे, शूजल गुप्ता यांच्या उत्कृष्ट खेळाने हा विजय साकारला. जॉली संघाचा हर्ष चौधरी चमकला. वरील दोन्ही विभागातील विजयी संघानी उपांत्य फेरी गाठली.


