गुहागर ः प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप, गुहागर यांच्या वतीने भंडारी हॉल, गुहागर येथे नुकतीच संपन्न झालेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुण्याच्या सागर वाघमारे व ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर यांनी एकेरी गटामध्ये विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व दाखवले.
पुरुष एकेरीच्या शानदार अंतिम सामन्यात सागर वाघमारे याने ठाण्याच्या पंकज पवारवर २५-२१, २५-१९ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. तर तिसऱ्या स्थानाच्या लढतीत मुंबईच्या विकास धारिया यांनी निलांश चिपळूणकरचा ७-२५, २५-१०, २५-१३ असा पराभव करून कांस्यपदक निश्चित केले.
महिला विभागात अत्यंत रोमांचक असे तीन सेटमध्ये अंतिम सामने पाहायला मिळाले. ठाण्याची समृद्धी घाडीगावकर हिने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला २१-२५, २४-५, २२-२० अशी थरारक मात देत विजेतेपदावर आपले नाव कोरले. मुंबईच्या सोनाली कुमारीने कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात रिंकी कुमारीवर २५-१३, २५-११ अशी मात केली.
स्पर्धेतील विजेत्यांना आयोजक प्रदीप परचुरे परिवार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतीन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, तसेच रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर व सचिव मिलिंद साप्ते यांच्या हस्ते रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक करताना, “गुहागरमध्ये आयोजित स्पर्धेने पुन्हा एकदा कॅरमला उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे,” अशी भावना व्यक्त केली.
उपांत्य फेरी निकाल
महिला एकेरी ः समृद्धी घाडीगावकर (ठाणे) हिने रिंकी कुमारी (मुंबई) वर २५-२३, २५-१ असा विजय संपादन केला. आकांक्षा कदम (रत्नागिरी) हिने सोनाली कुमारी (मुंबई) वर १२-२१, २५-२१, १९-१६ अशी मात केली.
पुरुष एकेरी ः सागर वाघमारे (पुणे) याने निलांश चिपळूणकर (मुंबई) वर २२-१६, ३-२५, २५-२ असा विजय साकारला. पंकज पवार (ठाणे) याने विकास धारिया (मुंबई) याचा २५-११, २१-७ असा पराभव केला.


