बुद्धिबळ स्पर्धेत जाधव, डावरे, शिंगटे प्रथम    

  • By admin
  • November 11, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप, आरएमएमएस व सरस्वती हायस्कूल वर्गमित्र मंडळ आयोजित सुवर्णपदक विजेते वर्ल्ड मास्टर पॉवर लिफ्टर दत्तात्रय उतेकर गौरवार्थ बुद्धिबळ स्पर्धेमध्ये साध्या जाधवने ७ वर्षाखालील, मृण्मयी डावरेने १० वर्षाखालील तर मनोमय शिंगटेने १३ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकाविला. 

मनोमय शिंगटेने पाच सामन्यात आक्रमक चालीसह अपराजित राहून गट विजेतेपदाला गवसणी घातली. साध्या जाधवने अव्यान उपाध्यायचे तर मृण्मयी डावरेने अधवान ओसवालचे कडवे आव्हान सरस सरासरीच्या बळावर मागे टाकून प्रथम स्थानावर झेप घेतली. 

या प्रसंगी माजी आमदार सुभाष बने, सुवर्णपदक विजेते दत्तात्रय उतेकर, तुकाराम तावडे, दत्तात्रय नेराळे, अरुण निंबाळकर, धोंडू राऊत, अशोक पवार, सुधाकर पावसकर, उमेश परब, दिवाकर सावंत, तानाजी परवडी आदींचा गौरव राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, सुनील बोरकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त  लीलाधर चव्हाण व अनंत चाळके आदींनी केला.

७ वर्षाखालील गटात साध्या जाधवने (३.५ गुण) प्रथम, अव्यान उपाध्यायने (३.५ गुण) द्वितीय, मेधांश बांगरने (३ गुण) तृतीय, युवीर शाहने (३ गुण) चौथा, आर. चेत्तीयारने (२ गुण) पाचवा, इनायाने (२ गुण) सहावा, विधान शाहने (२ गुण) सातवा, तारीस्श पारेखने (२ गुण) आठवा क्रमांक मिळवला.  १० वर्षाखालील गटात मृण्मयी डावरेने (४.५ गुण) प्रथम, अधवान ओसवालने (४.५ गुण) द्वितीय, आराध्य पुरोने (४ गुण) तृतीय, तनिष भाटीयाने (४ गुण) चौथा, सुजय सावंतने (४ गुण) पाचवा, मानस राणेने (४ गुण) सहावा, साश्वत कुमारने (३ गुण) सातवा, सैश गावकरने (३ गुण) आठवा नंबर पटकावला.तर १३ वर्षाखालील गटात मनोमय शिंगटेने (४.५ गुण) प्रथम, अद्विक शेट्टीने (३.५ गुण) द्वितीय, अरीव गर्जेने (३.५ गुण) तृतीय, गोकर्ण औटीने (३.५ गुण) चौथा, हृधान भारद्वाजने (३ गुण) पाचवा, सार्थक आंग्रेने (३ गुण) सहावा, ध्रुव कदमने (३ गुण) सातवा, राज गायकवाडने (३ गुण) आठवा क्रमांक  मिळविला. स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील सबज्युनियर बुद्धिबळपटूसह १२२ खेळाडू सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *