नागपूर ः डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नागपूर येथे पार पडलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात रॉकेट इंटरनॅशनल करिम स्पोर्ट्स संघाने प्रभावी कामगिरी करीत झेटटी माही लायन्स संघावर विजय मिळवत हिंगणा सिटी प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद पटकावले.
प्रथम फलंदाजी करताना झेडटी माही लायन्स संघाने २० षटकांत १६६ धावांचा स्पर्धात्मक स्कोर उभारला. संघाचे प्रमुख फलंदाज पियुष फुलसुंगे याने ४६ चेंडूत ५२ धावा करून संघाचा डाव सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रत्युत्तरादाखल रॉकेट इंटरनॅशनलने जोरदार फलंदाजी करत लक्ष्याचा पाठलाग सुरू ठेवला. गौरव बारब्दे याने केवळ ४१ चेंडूत दमदार ८६ धावा ठोकत संघाचा विजय जवळ आणला. संघाने १६.४ षटकांत फक्त २ गडी गमावत १६७/२ अशी धावसंख्या उभारून सामना सहज जिंकला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम सामन्यातील दोन्ही संघांमधील खेळाडूंचा उत्साह, दमदार कामगिरी आणि संयमित खेळामुळे सामना प्रेक्षकांसाठी रोमहर्षक ठरला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण व भक्कम कामगिरी करत रॉकेट इंटरनॅशनल करिम स्पोर्ट्स संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.



