पुरुष गटात श्री समर्थ, ओम समर्थ, विद्यार्थी, सरस्वती संघ उपांत्य फेरीत लढणार
मुंबई ः मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने दत्ताराम गायकवाड फाउंडेशन पुरस्कृत व ओम साई ईश्वर सेवा मंडळ लालबाग आयोजित पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सरस्वती कन्या संघ हा अमरहिंद मंडळा विरुद्ध तर ओम साईश्वर सेवा मंडळ शिवनेरी सेवा मंडळ विरुद्ध लढणार आहे तर पुरुषांच्या उपांत्य फेरीमध्ये श्री समर्थ व्यायाम मंदिर विरुद्ध ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर व विद्यार्थी क्रीडा केंद्र विरुद्ध सरस्वती स्पोर्ट्स क्लब या संघामध्ये होणार आहेत.
अत्यंत रंगतदार ठरलेल्या महिला गटाच्या सामन्यात सरस्वती कन्या संघाने ओम साई ईश्वर सेवा मंडळाचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात ७-६ असा एका गुणाने पराभव केला. या सामन्याची मध्यंतराची गुणस्थिती ४-३ अशी होती व एका कुणाची आघाडी सरस्वती कन्या संघाकडे होती. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी परत ३-३ गुण मिळवल्याने एका गुणाच्या आघाडीने सरासरी कन्या संघाने आपली बाजी मारली. सरस्वतीतर्फे उत्कृष्ट संरक्षण करताना जानवी लोंढे (३.२०, ३.५० मिनिटे संरक्षण व १ गुण), सेजल यादव (२, ४ मिनिटे संरक्षण व २ गुण) या दोघींना उत्तम साथ देत खुशबू सुतारने (३ मिनिटे संरक्षण व १ गुण) बहारदार खेळ केला. ओम साई ईश्वर सेवा मंडळातर्फे उत्कृष्ट लढत देत असताना वैष्णवी परब (४.३०, ५ मिनिटे संरक्षण व ३ गुण) तिला इशाली आमरेने (३.२०, २.१० मिनिटे संरक्षण व १ गुण) उत्तम साथ दिली. साखळीतील या निकालामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यात सरस्वती कन्या संघ हा अमरहिंद मंडळा विरुद्ध तर ओम साई ईश्वर सेवा मंडळ शिवनेरी सेवा मंडळ विरुद्ध लढणार आहे.
साखळी गटातील विजेता उपविजेता ठरणारा शिवनेरी सेवा मंडळ विरुद्ध अमरहिंद मंडळ या महिलांचा दुसरा सामना सुद्धा रंगतदार ठरला. ज्यामध्ये शिवनेरी सेवा मंडळाने अमरहिंद मंडळ दादर या संघावर दोन गुणांनी मात केली. मध्यंतराला चार विरुद्ध तीन अशी एका गुणाची आघाडी शिवनेरीकडे होती. ती मध्यंतरानंतर त्यांनी वाढवत ६-४ असा दोन गुणांनी हा सामना जिंकला. शिवनेरी सेवा मंडळातर्फे आरुषी गुप्ताने ३.५० मिनिटे संरक्षण केलं तर मुस्कान शेखने ५.३० मिनिटे संरक्षण करत दोन खेळाडू बाद करत उत्कृष्ट साथ दिली. अमरहिंद मंडळातर्फे खेळताना संजना कुडवने (१.४०, ४ मिनिटे संरक्षण व २ गुण), रुद्रा नाटेकरने ३.५० मिनिटे संरक्षण व २ गुण), रिद्धी कबीरने (२.१०, नाबाद ३ मिनिटे संरक्षण) यांनी जबरदस्त लढत दिली.
पुरुष गटातील अत्यंत बहारदार असा सामना रंगला तो श्री समर्थ व्यायाम मंदिर विरुद्ध विद्यार्थी क्रीडा केंद्र या संघांमध्ये. श्री समर्थ व्यायाम मंदिरने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा १४-१२ असा दोन गुणांनी पाडाव केला. मध्यंतराला दोन्ही संघ ७-७ अशा समान गुणांच्या पातळीवर होते. समर्थ संघातर्फे खेळताना पियुष घोलमने (२.२० मिनिटे संरक्षण व ५ गुण) अष्टपैलू खेळ केला व त्याला हितेश आग्रेने (१.२०, २.२० मिनिटे संरक्षण व २ गुण) व यश बोरकरने (१ मिनिटे संरक्षण व ३ गुण) उत्तम साथ देत विजयाला गवसणी घातली. तर विद्यार्थीच्या शुभम शिंदेने (१.४० संरक्षण व ४ गुण), सम्यक जाधवने (१.४० संरक्षण व ३ गुण) निकराची दिलेली लढत अपयशी ठरली. पुरुषांच्या उपांत्य फेरीमध्ये श्री समर्थ व्यायाम मंदिर विरुद्ध ओम समर्थ भारत व्या. मंदिर व विद्यार्थी क्रीडा केंद्र विरुद्ध सरस्वती स्पोर्ट्स क्लब या संघामध्ये होणार आहेत.
दुसरा सामना होता सरस्वती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध ओम समर्थ भारत व्या मंदिर माहीम यांच्यात रंगला होता. या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरचा २१-१२ (मध्यंतर १०-५) असा ९ गुणांनी पराभव केला. सरस्वती संघातर्फे उत्कृष्टरित्या खेळताना राहुल जावळेने १.३०, २ मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात चार खेळाडू बाद केले. प्रसाद पाताडेने १.२० मिनिटे संरक्षण केले व २ खेळाडू बाद केले. चैतन्यने २.५० मिनिटे संरक्षण केले व सहज विजयावर शिक्कामोर्तब केले. तर पराभूत ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरतर्फे सनी तांबेने चार गडी टिपले तर साई गुरवने एक मिनिट संरक्षण करत तीन गडी टिपत झुंजार खेळी केली मात्र ते आपला पराभव वाचवू शकले नाहीत.



