नवी दिल्ली : केंद्रीय युवा व क्रीडा व्यवहार तथा कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी किंग्ज बॅटन रिलेला दिल्लीतील डीएलएफ अव्हेन्यू, साकेत येथे सुरुवात झाली.
या उद्घाटन सोहळ्यास ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्त लिंडी कॅमरॉन, तसेच भारतीय राष्ट्रकुल क्रीडा संघाच्या अध्यक्ष पी टी उषा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी योगेश्वर दत्त, अचंता शरथ कमल, गगन नारंग यांसारखे ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदकविजेते खेळाडू, तसेच क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
आकिब वाणी या भारतीय दृश्य कलाकाराने तयार केलेल्या या बॅटनच्या डिझाइनमध्ये भारताची कला, संस्कृती, निसर्ग आणि शाश्वततेचे सुंदर दर्शन घडते.क्रीडा मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, “किंग्ज बॅटन रिले हे राष्ट्रकुलातील एकता, प्रगती आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. या बॅटनद्वारे भारताचा सांस्कृतिक वारसा आणि भविष्याकडे पाहणारी वृत्ती अधोरेखित होते.”
ही बॅटन १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान दिल्लीतील डीएलएफ अव्हेन्यू मॉलमध्ये सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, १४ नोव्हेंबरला अहमदाबादकडे प्रस्थान करणार आहे.ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल स्पर्धा २३ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान स्कॉटलंडमध्ये पार पडणार आहे.



