आरोग्य विद्यापीठात विविध क्रीडा प्रकारातील निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ

  • By admin
  • November 12, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

नाशिक ः राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा महोत्सव व अखिल भारतीय विद्यापीठ संघ क्रीडा स्पर्धेसाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेचा प्रारंभ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील, उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळू पेंढारकर व क्रीडा प्रशिक्षक आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ कडू यांनी सांगितले की, शैक्षणिक ज्ञानवृध्दीबरोबर क्रीडा कौशल्य निपुण व्हावे याकरीता विद्यापीठाकडून विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयस्तरावर खेळात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०२५- २०२६ होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा व अखिल भारतीय विद्यापीठ संघ क्रीडा स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या विविध संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संघात निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. त्यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, जलतरण व लॉन टेनिस स्पर्धा आहेत. महाविद्यालय स्तरातून खेळात पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनीमध्ये ही चाचणी स्पर्धा घेण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयाकडून प्रवेशिका मागविल्या होत्या. अखिल भारतीय विद्यापीठ संघ क्रीडा नियमानुसार स्पर्धा घेण्यात येत असल्याचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी सांगितले.

नाशिक येथे विद्यापीठ मुख्यालयात टेबल टेनिस व लॉन टेनिस स्पर्धा तसेच पंचवटी येथील श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय येथे बुद्धिबळ स्पर्धा, नाशिक जिमखाना येथे बॅडमिंटन स्पर्धा व स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलाव येथे जलतरण स्पर्धेचे दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ मिलिंद आवारे यांच्या हस्ते करण्यात आले.

या क्रीडा निवड चाचणी स्पर्धेकरीता राज्यातील विविध महाविद्यालयांचे १२५ पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले आहे. स्पर्धेचे मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक खेळातील अनुभवी क्रीडा तज्ज्ञांना परिक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

या क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणी उद्घाटन समारंभ प्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धेसाठी विद्यापीठातील कर्मचारी अविनाश सोनवणे, समाधान जाधव, अर्जुन नागलोत, शिवम आभाळे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *