दिव्यांग टी-२० क्रिकेट स्पर्धा ः सोलापूची गंगा कदम सामनावीर
नवी दिल्ली ः दिव्यांग (अंध) महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा १० गडी राखून दणदणीत पराभव करीत विजयी सलामी दिली. भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करणारी उपकर्णधार व सोलापूरची गंगा कदम ही या सामन्याची मानकरी ठरली. तिला १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
नवी दिल्लीतील मॉडर्न स्कूलच्या मैदानावर मंगळवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाचा डाव भारताने केवळ १३.३ षटकांत ४१ धावांत गुंडाळला. यात गंगा कदमने १ एक गोलंदाजी करत एक बळी घेतला. गंगाच्या प्रभावी क्षेत्ररक्षणामुळे श्रीलंकेचे पाच गडी धावबाद झाले.
विजयी लक्ष्य भारताने केवळ ३ षटकांत बिनबाद ४३ धावा करीत गाठले. सलामीच्या कर्णधार दीपिका व अनिता ठाकूर यांनी शानदार खेळी करीत संघाचा विजय सहज सुकर केला. दीपिकाने १४ चेंडूंत ४ चौकार ठोकीत २६ धावा केल्या. अनिताने ६ चेंडूत ३ चौकारांसह १५ धावा करीत तिला साथ दिली.
गंगा कदम ही येथील प्रशिक्षक राजू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली भैरूरतन दमाणी अंध शाळेतून घडली आहे. तिचे उद्योजक राजेश दमाणी, भैरुरतन दमाणी अंध शाळेचे सचिव संतोष भंडारी यांनी अभिनंदन केले.



