बीड ः जम्मू काश्मीर येथे सुरू असलेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी चॅम्पियन्स अकॅडमी बीडचा राष्ट्रीय खेळाडू ओंकार राजू परदेशी याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना ७३ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले आहे, अशी माहिती तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ६९ वी राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धा जम्मू काश्मीर येथे ९ ते १३ नोव्हेंबर दरम्यान सुरू आहे. १९ वर्षे वयोगटातील या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी ओंकार राजू परदेशी याने दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतना ७३ किलो वजनगटात चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय कांस्यपदक पटकावले आहे. बीड जिल्हा क्रीडा संकुलातील डॉ अविनाश बारगजे यांच्या चॅम्पियन्स तायक्वांदो अकॅडमीचा ओंकार हा खेळाडू आहे.
जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक डॉ योगेश क्षीरसागर, डॉ सारिकाताई क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे, डॉ अविनाश बारगजे, जया बारगजे, बन्सी राऊत, भरत पांचाळ, सुनील राऊत, डॉ विनोदचंद्र पवार, मनेश बनकर, प्रसाद साहू, बालाजी कराड यांच्यासह जिल्हा संघटनेच्या सर्व वरिष्ठ खेळाडू, सर्व पदाधिकाऱ्यांनी ओंकार याचे अभिनंदन केले आहे.



