मुंबई जिल्हा खो-खो स्पर्धेत सरस्वती कन्या, ओम साईश्वर, श्री समर्थ विद्यार्थी अंतिम फेरीत

  • By admin
  • November 13, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

मुंबई ः मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने दत्ताराम गायकवाड फाउंडेशन पुरस्कृत व ओम साई ईश्वर सेवा मंडळ लालबाग आयोजित पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. महिलांमध्ये सरस्वती कन्या आणि ओम साईश्वर तर पुरुषांमध्ये श्री समर्थ विद्यार्थी या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे.

महिलांच्या उपांत्य फेरीमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळाने शिवनेरी सेवा मंडळाचा ५-४ (मध्यंतर ५-१) असा एक डाव राखून दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाच्या वैष्णवी परबने दोन्ही डावात ४.३० मिनिट दमदार संरक्षण करून विजयावर शिक्कामोर्तब केले. तिला उत्तम साथ देत कादंबरी तेरवणकरने नाबाद ४.३० मिनिट व २.१० मिनिट संरक्षण करत २ गुण मिळवण्यात यश मिळवले व इशाली आंब्रेने २ मिनिट संरक्षण करत २ गुण वसूल केले व विजय सहज केला. तर पराभूत शिवनेरी सेवा मंडळाच्या आरुषी गुप्ताने ३.५० मिनिट संरक्षण केले, कार्तिकी कणसेने १.१० मिनिट संरक्षण करून २ गुण मिळवले तर मुस्कान शेखने १.५० मिनिट संरक्षण करत जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला.

महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सरस्वती कन्या संघाने अमरहिंद मंडळाचा ४-३ असा तब्बल साडेसहा मिनिटे राखून अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात सरस्वती कन्या संघाच्या शेजल यादवने ४.३०, ४.५० मिनिट संरक्षण केले व आक्रमणात दोन गुण वसूल करत अष्टपैलू खेळाची झलक पेश केली. त्यांच्याच खुशबू सुताराने २, नाबाद ४.१० मिनिट संरक्षण केले व आक्रमणात एक गुण मिळवला तर जान्हवी लोंढेने नाबाद २.३० मिनिट संरक्षण करून अंतिम फेरीचे दार आपल्या संघासाठी उघडले. तर पराभूत अमरहिंदच्या संजना कुडवने ४.२० मिनिट संरक्षण केले, देविशा म्हात्रेने १.५० मिनिट संरक्षण केले व आक्रमणात २ गुण वसूल केले तर रुद्रा नाटेकरने १.५० मिनिट, तन्वी उपळकरने नाबाद १.३० मिनिट व रिद्धी कबीरने १.२० मिनिट संरक्षण करून दिलेली लढत अपयशी ठरली.

पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाने माहीमच्या ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर १५-१३ (मध्यंतर १५-०७) असा एका डाव २ गुणांनी धमाकेदार विजय साजरा केला. या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरच्या प्रतीक होडावडेकरने १.३० मिनिट संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले, यश बोरकरने २.१०, १.४० मिनिट संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले, तर वरद भाटक, ओम भरणकर व हितेश आग्रे यांनी प्रत्येकी २-२ खेळाडू बाद करत विजयाला गवसणी घातली तर पराभूत ओम समर्थच्या सनी तांबेने १.३० मिनिट संरक्षण करून आक्रमणात ५ गडी बाद करत सामन्यात रंगत भरली तर प्रशिक मोरेने, सोहम विलणकरने प्रत्येकी २-२ खेळाडू बाद करत जोरदार लढत दिली.

पुरुष गटातील दुसरा उपांत्य फेरीच्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा २.३० मिनिट राखून ११-१० (मध्यंतर ५-५) असा एका गुणाने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पक्के केले. या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या जनार्दन सावंतने १.५०, २ मिनिट संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले, प्रतीक घाणेकरने २.५० मिनिट संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले, शुभम शिंदेने २ मिनिट संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले व सम्यक जाधवने १.५० मिनिट संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले व तर सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या करण गरोळेने १.३० मिनिट संरक्षण केले व ३ खेळाडू बाद केले त्याला धमाकेदार साथ देताना राहुल जावळेने ३ मिनिट संरक्षण केले व ३ खेळाडू बाद केले, रोहन टेमकरने २.४० मिनिट संरक्षण करताना १ खेळाडू बाद केला तर श्रेयस राऊळने २ मिनिट संरक्षण करून १ खेळाडू बाद केला मात्र ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *