छत्रपती संभाजीनगर ः मौलाना आझाद कॉलेजच्या वाणिज्य शाखेतील बारावीचा विद्यार्थी शेख उमर अहमद शेख महमूद अहमद याने आंतर शालेय विभागीय पातळीवरील वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
या उल्लेखनीय यशामुळे शेख उमर याची निवड आता राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी झाली आहे. या शानदार कामगिरीनिमित्त मौलाना आझाद कॉलेजचे प्राचार्य डॉ मझहर अहमद फारूकी आणि उपप्राचार्य शेख अब्बास यांनी उमरचा सत्कार करून त्याचे अभिनंदन केले.
हे यश महाविद्यालयाच्या क्रीडा समिती आणि प्रशिक्षक प्रा अकबर खान (विभाग प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाले. या वेळी शेख अख्तर, हसन जामा खान, शेख आसिफ पटेल आणि शेख अझहर बाबूर हेही उपस्थित होते आणि त्यांनी उमरचे अभिनंदन केले.
उमरच्या या यशाबद्दल त्याचे वडील शेख महमूद अहमद यांनी मोठा अभिमान व्यक्त केला आणि राज्यस्तरीय स्पर्धेत मुलगा आणखी यश संपादन करील, असा विश्वास व्यक्त करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मौलाना आझाद कॉलेजच्या या विद्यार्थ्याने मिळवलेले हे सुवर्णयश केवळ संस्थेचा नव्हे, तर संपूर्ण शहराचा अभिमान वाढवणारे ठरले आहे.
