श्रीरामपुरच्या गौरव डेंगळे यांची भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या निवड समिती सदस्यपदी नियुक्ती

  • By admin
  • November 13, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

श्रीरामपूर ः श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा या गावचे सुपुत्र आणि क्रीडा क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले गौरव अरविंद डेंगळे यांनी आपल्या क्रीडा कार्याच्या जोरावर पुन्हा एकदा राज्याचा आणि जिल्ह्याचा मान उंचावला आहे. नुकतीच त्यांची भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या निवड समिती सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. 

गौरव डेंगळे यांना ही जबाबदारी आगामी ६९ व्या राष्ट्रीय १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निवड प्रक्रियेसाठी देण्यात आली असून, या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन उत्तर प्रदेशातील बरेली येथे करण्यात आले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे केवळ खंडाळा गावच नव्हे, तर श्रीरामपूर तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अभिमान वाढला आहे.

गौरव डेंगळे हे लहानपणापासूनच क्रीडाप्रेमी असून, त्यांनी खेळाडू म्हणून जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर आपली छाप उमटवली. पुढे त्यांनी प्रशिक्षक, निवड चाचणी सदस्य व तांत्रिक अधिकारी म्हणून क्रीडा क्षेत्रात स्वतःस सिद्ध केले. त्यांनी गेली जवळपास दोन दशके ग्रामीण भागातील क्रीडा चळवळीला दिशा देत सातत्याने काम केले आहे. सध्या ते कोपरगाव येथील सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या प्रशिक्षणाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. 

खेळातली तांत्रिक समज, प्रशिक्षणातील शिस्त आणि खेळाडूंमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याची क्षमता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.२०१९ मध्ये पुणे येथे झालेल्या “खेलो इंडिया युथ गेम्स”मध्ये त्यांनी तांत्रिक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली, तर २०२३ मध्ये गोवा येथे झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांनी गोवा नेटबॉल संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून भूमिका बजावली. याशिवाय त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघाच्या निवड समिती सदस्य म्हणूनही योगदान दिले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना राज्यभरात क्रीडा व प्रशासकीय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

गौरव डेंगळे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य पुढे आणण्यासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांनी सलग अकरा वर्षे “व्हॉलीबॉल प्रीमियर लीग” स्पर्धेचे आयोजन करून अनेक तरुणांना खेळाच्या माध्यमातून घडवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धांमधून त्यांनी ग्रामीण भागात व्हॉलीबॉल खेळाची आवड आणि संस्कृती निर्माण केली आहे.
गौरव डेंगळे हे केवळ एक प्रशिक्षक नसून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. 

त्यांच्या कार्यातून क्रीडा क्षेत्रातील प्रामाणिकता, संघभावना आणि आत्मविश्वास यांचे धडे तरुण खेळाडूंना मिळत आहेत. त्यांच्या यशस्वी प्रवासाने हे सिद्ध केले आहे की समर्पण, सातत्य आणि मेहनत यांच्या जोरावर ग्रामीण भागातील खेळाडू देखील राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करू शकतात. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सोमैया ट्रस्टचे अध्यक्ष समीर सोमय्या, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सीईओ पार्थ दोशी, गोवा ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य निलेश नाईक, सुहास गोडगे (अध्यक्ष, गोदावरी बायो रिफायनरी लिमिटेड साखरवाडी), के एल वाकचौरे, प्राचार्य श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव, सोमय्या स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख आझाज खान, आदित्य सिंग, ज्येष्ठ पत्रकार भास्करराव खंडागळे आदींनी डेंगळे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे खंडाळा गावात आणि श्रीरामपूर तालुक्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक क्रीडाप्रेमी, माजी खेळाडू, शाळांतील शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनीही त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

गौरव डेंगळे हे खंडाळा गावचे प्रगतिशील शेतकरी अरविंद डेंगळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून, कुटुंबात लहानपणापासून शिक्षणाबरोबर खेळाबद्दलची आवड जोपासली गेली आहे. या पार्श्वभूमीवरच त्यांनी आपल्या गावातून सुरुवात करून आज राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले आहे. खंडाळा या छोट्याशा गावातून उगवलेला हा क्रीडा दूत आता भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या निवड प्रक्रियेत आपली छाप उमटवणार असून, त्यांच्या या यशाने श्रीरामपूर तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्राचा मान निश्चितच उंचावला आहे. गौरव डेंगळे यांचा हा प्रवास म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी दाखवून दिले आहे की संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडूही देशाच्या क्रीडा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांच्या समर्पण, शिस्त आणि सातत्यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात नवे पर्व सुरू होत असून, त्यांच्या आगामी कार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *