मुंबई ः मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने दत्ताराम गायकवाड फाउंडेशन पुरस्कृत व ओम साई ईश्वर सेवा मंडळ लालबाग आयोजित पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर आणि महिला गटात माहीमचा सरस्वती कन्या संघांनी विजेतेपद पटकावले.
ओम साईश्वर सेवा मंडळाच्या पेरू कंपाऊंड, लालबाग येथील मनोरंजन मैदानात रंगलेल्या अंतिम फेरीच्या पुरुष गटाच्या सामन्यात दादरचा श्री समर्थ व्यायाम मंदिर संघ सुमारे दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिमाखात विजेता ठरला. अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत श्री समर्थने विद्यार्थी क्रीडा केंद्र परेलच्या संघावर १६-१० (७-४-९-६) असा ६ गुणांच्या फरकाने विजेतेपद संपादन केले.
श्री समर्थ संघातर्फे खेळताना पीयूष घोलमने २ मिनिट संरक्षण करून व आक्रमणात ५ गडी बाद करत अष्टपैलू खेळ केला. वेदांत देसाईने २.१०; २.२० मिनिट संरक्षण करत आक्रमणात ३ गडी बाद केले. वरूण पाटीलने २, १ मिनिट संरक्षण केले, अनंत चव्हाणने १.५० व १.२० मिनिट संरक्षण, हितेश आग्रेने १.१०, १ मिनिट संरक्षण केले तर विशाल खाकेने १.५० मिनिट संरक्षण केले व आक्रमणात ३ गडी बाद केले तर यश बोरकर याने सुंदर झेप घेत खांबावर एक गडी टिपत चांगला खेळ केला. तर पराभूत विद्यार्थीच्या हर्ष कामतेकरने २.१०, १.१० मिनिट संरक्षण करत २ गडी बाद केले. ओमकार मिरगळने १.१० मिनिटे संरक्षण करत ४ खेळाडू बाद केले. त्यांना सम्यक जाधवने २ मिनिट संरक्षण करत व २ खेळाडू बाद केले. तर पियुष कांडघेने १.१०, १.१० संरक्षण केले व १ खेळाडू बाद करत सुंदर लढत दिली.

महिलांच्या अंतिम फेरीच्या रंगलेल्या सामन्यात सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली ती सरस्वती कन्या संघ माहीमने. मध्यंतराला २-२ अशा रंगलेल्या या सामन्यात सरस्वती संघाने दुसऱ्या डावात आक्रमणाची धार वाढवत विजेतेपद हासील केले. माहीमच्या सरस्वती कन्या संघाने लालबागच्या यजमान ओम साईश्वर सेवा मंडळावर ७-४ (०२-०२-०५-०२) असा तीन गुणांनी पराभव केला.
सरस्वतीच्या जान्हवी लोंढेने दोन्ही डावात नाबाद राहत ३.३०, २ मिनिट संरक्षण केले व २ खेळाडू बाद करत अष्टपैलू खेळ केला. सेजल यादवने ३.१०, ४.५० मिनिट संरक्षण केले, खुशबू सुतारने २.२०, २.१० मिनिट पळतीची खेळी करत सुंदर साथ दिली. तर पराभूत यजमान ओम साईश्वरच्या वैष्णवी परबने ४, ३.१० मिनिट संरक्षण केले व कादंबरी तेरवणकरने ४.१०, २.४० मिनिटे संरक्षण केले तर काजल मोरेने ३ खेळाडू बाद करत चांगली लढत दिली.
महिला गटात स्पर्धेचे तृतीय स्थान शिवनेरी सेवा मंडळ, नायगाव तर चतुर्थ स्थान अमर हिंद मंडळ, दादर यांनी पटकावले. व पुरुष गटात स्पर्धेचे तृतीय स्थान सरस्वती स्पोर्ट्स क्लब तर चतुर्थ स्थान ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर माहीम यांनी पटकावले.
मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष अॅड अरुण देशमुख, सचिव सुरेंद्र विश्वकर्मा व आयोजक श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी मुंबई खो-खो संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खो-खो प्रेमी अत्यंत उत्साहात हजर होते.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
अष्टपैलू खेळाडू ः पियुष घोलम (श्री समर्थ), जान्हवी लोंढे (सरस्वती).
उत्कृष्ट संरक्षक ः हर्ष कामतेकर (विद्यार्थी), सेजल यादव (सरस्वती).
उत्कृष्ट आक्रमक ः वेदांत देसाई (श्री समर्थ), कादंबरी तेरवणकर (ओम साईश्वर).


