विभागीय बेसबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी
नांदेड ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर आणि हौशी बेसबॉल असोसिएशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विभागीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल, बारड येथील १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर मोहोर उमटवली.
विभागातून सर्वप्रथम येत त्यांनी उत्कृष्ट कौशल्य आणि दमदार एकजूट दाखवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.संघातील सर्व खेळाडूंच्या कठोर मेहनतीचे विशेष कौतुक होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक तसेच मुलींना प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन करणारे मुख्य क्रीडा प्रशिक्षक बाबुराव कुलूपवाड यांचे योगदान लक्षणीय आहे. सरांनी कागदपत्रांपासून प्रशिक्षणापर्यंत प्रत्येक स्तरावर मुलींच्या प्रगतीसाठी सातत्याने परिश्रम घेतले.
तसेच हौशी बेसबॉल संघटनेचे सचिव आनंदा कांबळे यांच्या सहकार्याने संघाने अधिक भक्कम कामगिरी साकारली. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व मुली, प्रशिक्षक, मुख्याध्यापक आणि सहाय्यकांचे हार्दिक अभिनंदन. आगामी राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी बारड संघाला मनःपूर्वक शुभेच्छा!


